कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमाबंदी नियमांचे कटाक्षाने पालन व्हावे- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

वडगाव कोल्हाटी, वाळूज, गंगापूर, वैजापूर कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच चेकपोस्ट, बाजारपेठांची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गोंदावले यांच्याद्वारे संयुक्त पाहणी

औरंगाबाद,२८ एप्रिल /प्रतिनिधी  :-  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आटोक्यात रहावे यासाठी प्रथम वाळूज, गंगापूर, वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरमधील उपचार सुविधा व त्यात वाढ करण्याबाबत तसेच बाहेरील जिल्ह्यातून ये जा करणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्याच्या सीमा बंदीचे नियमांचे कटाक्षाने पालन करित स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

May be an image of one or more people, people standing and indoor

        ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने यांनी आज वडगाव कोल्हाटी येथील आरोग्य उपकेंद्र, वाळूज, गंगापूर, वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड केअर सेंटर, तसेच चेकपोस्टला भेट देत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक के.मल्लिकार्जून प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी आमदार रमेश बोरनारे, स्थानिक लोकप्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, माणिकराव अहिरे, गंगापूर, वैजापूर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत बिघोत, तहसीलदार सारिका शिंदे, राहुल गायकवाड, नायब तहसीलदार निखल धूडधर तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

May be an image of one or more people, people standing and outdoors

            जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वडगाव कोल्हाटी येथील उपकेंद्राची पाहणी करीत येथे होणाऱ्या कोरोना चाचणी, लसीकरण या बाबत माहिती घेतली. तसेच येणाऱ्या काळात 18 ते 44 वर्षे वयाचे सर्वांचे लसीकरण सुरू होईल. त्याबाबत काटेकोर नियोजन करण्याची सूचना केली. त्याचबरोबर कोरोना चाचणी व लसीकरण करतांना काही अपप्रवृत्तींद्वारे आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी होत असल्यामुळे या उपकेंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही संबधितांना दिले.

            वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर हॉस्पीटलमधील पूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे उपचार सुविधा उपलब्ध केल्याबाबत पाहणी करीत येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. तसेच ऑक्सिजन प्लांट तातडीने सुरक्षिततेच्या उपाया योजनांसह उभारण्याबाबत संबंधितांशी चर्चा केली. ग्रामीण भागातील उचार केंद्रातच स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभारल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना इथेच वेळेत उपचार होतील त्यांना शहरात जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांचे प्राण वाचतील, असे जिल्हाधिकारी श्री.चव्हाण म्हणाले.

May be an image of one or more people, people standing and outdoors

            जिल्ह्यातील अहमदनगर, नाशिक या सीमवरील चेकपोस्टला भेट देत परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून हा बंदोबस्त आणखी कडक ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्न यांनी चेक पोस्टवर अधिक बॅरिकेट्स लावणे, सीसीटीव्ही लावणे, पासची कडक तपासणी, करीत पास नसलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेमार्फत चेकपोस्टवरील पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह, वीज आदी सुविधा उपलब्धक रुन देण्याच्या सूचना केल्या.

            कायगाव येथील कंन्टेंटमेंट झोनला भेटी दरम्यान संसर्ग रोखण्यासाठी कायगाव लगत गावांतील नागरिकांचे 100 टक्के चाचणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर हॉस्पाीटलला भेट देत येथील अडचणी जाणून घेत रुग्णालयास सर्व प्रकारची मदत तसेच ऑक्सिजन प्लांटची उभारण्यास मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरला भेट देत तेथील उपचार सुविधांबाबत माहितीही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी घेतली. यावेळी श्री.चव्हाण म्हणाले की, सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभाग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका हे अतिशय चांगले काम करीत आहेत. कोरोना संकट कायमचे मिटविण्यासाठी आपल्याला आणखी जोमाने काम करायचे आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी यांनी त्यांचे मनोबल उंचावले.