रुग्णांना बाहेरुन औषध आणायला  लावली; डॉक्टर निलंबित 

लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची कोविड वॉर्डातील डॉक्टरांवर कारवाई

लातूर ,२८एप्रिल /प्रतिनिधी 

उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णलयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी मेडिकलवरुन औषधी आणावयास लावणाऱ्या डॉक्टरला, जिल्ह्याधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२८) तडकाफडकी निलंबीत केले. डॉ. दिनकर पाटील असे या डॉक्टरचे नाव असून २१५ रुग्णांसाठी त्यांनी बोहरुन औषधी खरायला लावल्याचे समोर आले आहे.
निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना शहरातील महाजन मेडिकलवरुन औषधी आणण्यासाठी डॉ. दिनकर पाटील यांनी चिठ्ठी दिल्याच्या एका रुग्णाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तहसीलदार गणेश जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी मेडिकलवर धाड टाकून कारवाई केली होती. यात सदर मेडिकलवरुन २१५ रुग्णांच्या नातेवाईकांनी औषधी खरेदी केल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ चे नियम ३ चा भंग केल्याचा ठपका ठेवत तहसीलदारांनी याचा अहवाल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे पाठविला होता. हा अहवाल प्राप्त होताच, औषधे आणावयास भाग पाडणऱ्या डॉक्टरला बुधवारी तडकाफडकी निलंबीत करण्यात आले.