ज्येष्ठे नेते एकनाथराव गायकवाड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 28 : समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांचे मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व माजी राज्यमंत्री, माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या निधनामुळे हरपले आहे. त्यांच्या नेतृत्वाची पोकळी जाणवत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणतात, समाजकारणात रमलेल्या ज्येष्ठ नेते गायकवाड यांनी दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे. धारावी आणि मुंबईतील जनमानसाशी जोडून घेऊन त्यांनी विधिमंडळात आणि संसदेतही उत्कृष्ट असे काम केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांचा उत्तम जनसंपर्क होता. लोकाभिमुख विकासकामांना चालना देताना त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. त्यांची पोकळी निश्चितच जाणवत राहील. ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी खासदार सन्माननीय एकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनाने समाजातील वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. एकनाथराव गायकवाड साहेबांचे नेतृत्व समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचलेले, सर्वमान्य नेतृत्व होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि काँग्रेसच्या विचारधारेशी ते जीवनभर प्रामाणिक राहिले. त्यांचे निधन ही समाजातील पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. आम्ही सर्वजण गायकवाड साहेबांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड
एकनाथ गायकवाड यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावपूर्ण श्रद्धांजली

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे निष्ठावान, अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

महसूलमंत्री थोरात म्हणाले की, तरूण वयात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे एकनाथ गायकवाड शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सतत कार्यरत असत. जनतेला सहज उपलब्ध असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. धारावीतील जनतेने त्यांना तीन वेळा आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून दिले होते. राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. पक्ष संघटनेतही त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. दलित चळवळीतही ते सक्रिय होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व गमावले आहे. एकनाथ गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठीण प्रसंगी आम्ही सर्व गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे श्री.थोरात म्हणाले.

र्वांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक आणि अनुभवी नेतृत्व हरपले – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधनाचे वृत्त अतिशय दु:खद असल्याची भावना व्यक्त करत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अन्न,नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. १९८५ पासून २००४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविले. कार्यकुशल असलेले एकनाथ गायकवाड हे कुशल संघटक देखील होते.

सलग दोन वेळा त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राचे नेतृत्व केले होते. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख होती. साधी राहणी असलेल्या एकनाथ गायकवाड यांचा जनसंपर्क दांडगा होता. मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सर्वांना सोबत घेऊन जातानाच धारावी पुनर्विकास प्रकल्प व्हावा अशी त्यांची आग्रही मागणी होती. ते सातत्याने त्यासाठी प्रयत्न देखील करत होते.

एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने सामाजिक चळवळीचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे मत व्यक्त करतानाच त्यांच्या कन्या मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासह त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात मी व माझे संपूर्ण कुटूंब सहभागी असल्याची भावना देखील श्री.भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा हरपला!-सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, आयुष्यभर त्यांनी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तेवत ठेवला. राजकारणात अनेक चढ-उतार सोसले. पण कधीही आपल्या तत्वांचा त्याग केला नाही. युवक काँग्रेसपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आमदार, मंत्री, खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी बहरत गेली. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण आपली साधी राहणी व कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी कधी सोडला नाही. ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे व कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. त्यामुळेच प्रदीर्घ काळ आमदार व खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती.

एकनाथ गायकवाड यांच्यावर काळाने कोरोनाच्या रूपात घातलेला घाला काँग्रेस पक्ष आणि समाजासाठी मोठी हानी आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व आमच्या सहकारी प्रा.वर्षाताई गायकवाड तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना करतो.

एकनाथराव गायकवाड यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा बुलंद आवाज हरपला — सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री व माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या निधनाने सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी भक्कमपणे लढणारा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी एकनाथराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.

एकनाथराव गायकवाड यांनी समाजकारण करताना सर्वसामान्यांचे प्रश्न आपले समजून त्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे ते निष्ठावंत नेतृत्व होते. काँग्रेसच्या विचारधारेशी आजीवन प्रामाणिक राहणाऱ्या गायकवाड यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्वजण गायकवाड साहेबांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे श्री.देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.