रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजारात चढ्या भावाने विक्री,सहा आरोपींना कोठडी 

औरंगाबाद ,२८ एप्रिल /प्रतिनिधी 

जालन्याच्या कोविड सेंटरमधील कामगाराने रेमडेसिवीर इंजेक्शन लांबवले. त्यांची काळ्याबाजारात चढ्या भावाने विक्री करताना गुन्हे शाखा पोलिसांनी कामगारासह सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडून पाच इंजेक्शन, सहा मोबाइल आणि कार असा पाच लाख ६४ हजार ५८७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, त्‍यांना एक मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी बुधवारी दि.२८ दिले. आरोपींमध्‍ये शहरातील दोघांचा तर जालना जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे.

दिनेश कान्हु नवगिरे (२८, रा. जयभीमनगर, गल्ली क्र. ३), रवि रोहिदास डोंगरे (रा. भाग्यनगर,औरंगाबाद), महावितरण कंपनीतील संदीप सुखदेव रगडे (३२), प्रविण शिवनाथ बोर्डे (२७, दोघेही रा. आंबेडकरनगर, ता. बदनापुर), नरेंद्र मुरलीधर साबळे (३३, रा. समतानगर, ता. बदनापुर) आणि  नगर परिषदेतील कंत्राटी कामगार अफरोज खान इकबाल खान (रा. बदनापुर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राजगोपाल बजाज (५५) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, गुन्‍हे शाखेला माहिती मिळाली की, दिनेश नवगिरे हा रेमडेसिवीर इंजेक्शनची अवैधरित्‍या चढ्या भावाने वि‍क्री करित आहे. त्‍यानूसार, २६ एप्रिल रोजी गुन्‍हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जारवाल व त्‍यांच्‍या पथकाने बनावट ग्राहका आधारे नवगिरे याच्‍याकडे रेमडेसिवीरची मागणी केली. त्‍याने एका इंजेक्शची किंमत २० हजार रुपये सांगुन ती फोन पे व्‍दारे मोबाइलवर टाकण्‍यास सांगितले. त्‍यानूसार बनावट ग्राहकाने २० हजार रुपये नवगिरे याच्‍या मोबाइलवर ट्रान्‍सफर केले. त्‍यानंतर नवगिरे यांने इंजेक्शन घेण्‍यासाठी बनावट ग्राहकाला सांयकाळी घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांच्‍या वसतीगृहाजवळी रिक्षा स्‍टॅडवर बोलावले. त्‍यानूसार पोलिसांनी सापळा रचून नवगिरे याला अटक केली.

 त्याच्या चौकशीत जालन्यातील कोविड सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करत असल्याचे समोर आले. त्यावरुन पोलिसांनी धाव घेऊन त्याच्या अन्य सहा साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी पाच रेमडेसिवीर इंजेक्शन, सहा मोबाइल, कार (क्रं. एमएच-२४-एम-५६) असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी आरोपी अफरोज खान याने सदरील इंजेक्शन कोठून आणले, त्‍याला कोणी मदत केली याचा तपास करणे आहे. अफरोज खान याने इतर अटक आरोपीने अशा प्रकारे आणखी किती इंजेक्शन दिले,त्‍याला कोविड सेंटर मधून कोणी सहाकार्य केले का याचा देखील तपास करणे आहे. आरोपीचे आणखी साथीदार आहेत का याचा तपास करणे आहे. आरोपी नवगिरे याच्‍या फोन पेवर ट्रान्‍सफर केलेले २० हजार रुपये जप्‍त करणे आहे. आरोपींचे मोठे रॅकेट असण्‍याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्‍या दृष्‍टीने तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.