रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे दोघे जेरबंद

लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषधी विभागाची कारवाई; इंजेक्शन जप्त

लातूर  ,२८ एप्रिल /प्रतिनिधी 

कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात मृत्युशी झुंज देणाऱ्या रुग्णांना जीवदान देण्यासाठी उपयोगी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन धावपळ करुनही उपलब्ध होत नाही. परंतू काही महाभाग २५ हजार रुपयांना एक याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस व अन्न व औषधी विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करून जास्त किमतीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन्सची विक्री केली जात असल्याची माहिती लातूर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथक मागील काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या इसमांच्या मागावर होते. दरम्यान, काही लोक लातूर शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करुन जास्त किमतीमध्ये इंजेक्शन विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलीस अधीक्षीक निखील पिंगळे यांनी काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, संपत फड, सुधीर कोळसुरे, बालाजी जाधव, नाना भोंग, नामदेव पाटील तसेच अन्न व औषधी विभागाचे औषध निरीक्षक सचिन बुगड यांच्या पथकाने शाहू चौकाच्या पुढे आंबेडकर चौकाजवळ अनिकेत माधव तेलंगे (२०, रा. जानवळ, ह. मु. नाथनगर लातूर) आणि ओमकार भगवान शेळके (२६, रा. आष्टा, ह. मु. लातूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ रेमडेसिवीर इंजेक्शन किमती १०२०० रुपये आणि दोन मोबाईल किंमत २० हजार रुपये असा एकूण ३० हजार २०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ते दोघे सदर रेमडेसिवीर इंजेक्शन्स प्रत्येकी २५ हजार रुपये दराने गरजू व्यक्तींना विक्री करणार होते. या दोघांसह अन्य एक व्यक्ती अशा एकूण तिघा इसमावर पोलिसांनी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे कलम ४२०, १८८, ३४ भादंविनुसार व कलम ३, ७ जीवनावश्यक वस्तू कायदा, कलम ३ साथरोग नियंत्रण कायदा, कलम २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ कलम १८ सी २७ औषधी आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.