साठोत्तरी साहित्याने मराठी साहित्य लोकशाहीवादी केले – लक्ष्मीकांत देशमुख

नवी दिल्ली, २६ : साठोत्तरी साहित्याने दलित, शोषित आणि बहुजन समाजातील लोकांचा साहित्यात सहभाग आणला व साहित्याचे विकेंद्रीकरण होऊन मराठी साहित्य लोकशाहीवादी केले, असे मत निवृत्त सनदी अधिकारी, लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोमवारी मांडले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘मराठी साहित्य आणि लोकशाही -१९६० ते २०२०’ या विषयावर ३७ वे पुष्प गुंफताना श्रीदेशमुख  बोलत होते

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून गेल्या ६० वर्षात मराठी  साहित्याचे किती प्रमाणात लोकशाहीकरण झाले, ते कितपत योग्य होते तसेच लोकशाही मूल्यांची बूज राखणारे होते किंवा नव्हते या परिप्रेक्ष्यात श्री .देशमुख यांनी यावेळी विवेचन केले. त्यांनी १९६० ते १९९० अर्थात साठोत्तरी साहित्य आणि जागतिक उदारीकरणानंतर सुरु झालेले नव्वदोत्तरी  मराठी साहित्य अशा दोन टप्प्यात  विषयाची मांडणी केली. साठोत्तरी चळवळीत अनियतकालिकांची, दलित साहित्याची, ग्रामीण साहित्याची चळवळ आणि साहित्यातील स्त्रीमुक्तीच्या प्रारंभाचा काळ तसेच १९९० नंतर देशात झालेल्या आर्थिक बदलांमुळे मराठी साहित्यावर त्याचे पडलेले प्रतिबिंब असा पट त्यांनी यावेळी उलगडला. तसेच साठोत्तरी साहित्य हे बहुजनवादी साहित्य होते व या साहित्याने अभिजनवादी संस्कृतीवर मात करून मराठी साहित्य लोकशाहीवादी केले ,असे श्री देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्राची विकेंद्री आणि ग्रामपातळीपर्यंत पोहोचलेली अहिंसक पद्धतीची लोकशाही आणि मराठी साहित्याची सर्वसमावेशकता हे पुरोगामी महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. १९४० पासून मराठी भाषेत नव साहित्याचे युग सुरु झाले होते. मात्र, ते प्रामुख्याने कथा, कादंबरीत प्रतिबिंबित होत होते आणि १९६०च्या दशकात ते ऐनभरात होते.  हे साहित्य उच्चवर्णी व एतद्देशीय होते. नव साहित्य हे प्रयोगशील असले तरी आशयाच्या अंगाने  जुनेच राहिले , त्यात बहुजनांचे सुख दु:ख नव्हते.

साहित्याने लोकशाहीकरणाकडे वळण घेतले

१९६० नंतर लोकांकडे ज्ञानगंगा पोहोचली होती. साहित्यात बदल होऊ लागले. याच काळात  बहुजन, दलित, आंबेडकरी साहित्याने नव साहित्याला नाकारत साहित्य निर्मितीला प्रारंभ केला व येथूनच साहित्याने लोकशाहीकरणाकडे वळण घेतले. याच काळातील सुरु असलेली अनियतकालिकांची चळवळ मनामनांपर्यंत पोहोचली व चर्चा सुरु झाली. या चळवळीने साठोत्तरी साहित्याला नवे वळण मिळाले .याने नवीन प्रयोगशील जीवनवादी संवेदना दिली.  पुस्तकी भाषेचे अवाजवी महत्त्व कमी करून बोलीभाषेला महत्त्व प्राप्त करून दिले. देश विदेशातील अन्य साहित्याचे वाचन व्हावे अशी  भूमिका या चळवळीने मांडली.

दलित साहित्याने मराठी साहित्याचे लोकशाहीकरण वेगवान केले

साठोत्तरी मराठी साहित्यात महत्त्वाच्या तीन चळवळींचा समावेश होतो व त्यात दलित साहित्य चळवळ महत्त्वाची आहे या चळवळीने लोकशाहीकरणाला वेग दिल्याचे श्री देशमुख म्हणाले.   दलित साहित्य चळवळ हे मराठी साहित्याचे वैभवशाली पर्व आहे.  यामुळे भारतातील दलित साहित्य प्रस्थापित झाले. ही भारतीय साहित्याला मराठी साहित्याने दिलेली देणगी आहे.  आत्मभान, आत्मशोध, नकार आणि विद्रोह ही दलित साहित्याची आशयसूत्रे होती. जीवनाचे सत्य सांगितले पाहिजे ,मानवमुक्ती शोधली पाहिजे ही या साहित्याची भूमिका होती. या चळवळीने मराठी  साहित्य समीक्षा,सौंदर्यविचार बदलले हे या साहित्याचे महत्त्वाचे योगदान होय. या साहित्य चळवळीत ‘आत्मकथा’ आणि ‘कविता’ या साहित्य प्रकारात विपुल लेखन झाले. या साहित्याने भारत व जगाला महान कवी नामदेव ढसाळ यांच्यासह दया पवार, बाबुराव बागुल, यशवंत मनोहर, दत्ता भगत, शरणकुमार लिंबाडे आदी साहित्यिक दिले. नारायण सुर्वे यांच्यामुळे दलित कवितेला कामगार दु:खाचे कलम जोडले गेले. १९८० पर्यंत ही चळवळ भरात होती. यानंतर ओहोटी लागली व  तिचा जोर ओसरला असे श्री. देशमुख म्हणाले.

ग्रामीण साहित्य चळवळ

दलित वर्गाशिवाय शेती व्यवसाय हा जगण्याचा मुख्य आधार असलेला ग्रामीण भागातील बहुजन वर्गाचे प्रश्न साहित्यातून मांडणारे साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य होय. ही साहित्य चळवळ  सुरु करून आनंद यादव यांनी या चळवळीला एक निश्चित स्वरूप दिले. यानंतर रा. रा. बोराळे व त्यांची ‘पाचोळा’ या कादंबरी ने या चळवळीस बळ दिले. या साहित्यात ग्रामीण जीवनाचे वास्तव,अगतिकता होती. पंचायत राजच्या माध्यमातून नव्या संस्थांची निर्मिती व त्यातून मुठभरांची झालेली समृद्धी व त्या भोवती फिरणारे राजकारण सत्ताकारण होते. या साहित्याने महात्मा फुले यांना आदर्श मानून लिखाण करत नवे अब्राह्मणी साहित्य शास्त्र सौंदर्यशास्त्र निर्माण केले  असेही श्री  देशमुख म्हणाले.

पुरुषी अन्यायाला वाचा फोडणाऱ्या स्त्रीमुक्ती साहित्याचा प्रारंभ

१९७५ हे वर्ष मराठी साहित्यासाठी स्त्रियांसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरले. यावर्षी ‘आंतरराष्ट्रीय महिला हक्क दिवस’  व ‘आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते. येथूनच महाराष्ट्र व देशात स्त्रीमुक्तीचा प्रारंभ झाला. धर्म व पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांचे होणारे शोषण, अन्याय होतो तो दूर व्हावा यासाठी  स्त्रियांचे स्वावलंबन त्यांचे स्वातंत्र्य, अधिकार यांचे पुरस्कार करणारे साहित्य  स्त्रीवादी साहित्याचा या काळात मराठी साहित्यात उदय झाला .मेघना पेठे, गौरी देशपांडे यांनी वेगळे व वेधक लिखाण केले. या साहित्यात स्त्री पुरुष संबंध विवाह संस्थेत स्त्रीची होणारी घुसमट व आत्मशोध हे या साहित्याचे विषय होते. पुरुषी अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या साहित्याने पुरुषांचे आत्मभान जागृत झाले तो बदलत गेला हे या साहित्याचे सर्वात मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

१९९० ते २०२० नवदोत्तरी साहित्य

नवदोत्तरी साहित्य हे मराठी साहित्यातील वेगळे पर्व होते. १९४७ ते १९९० या काळात भारतीय लोकशाहीचा तोंडवळा हा समाजवादी विचारांचा होता त्याचेच प्रतिबिंब साहित्यात होते. १९९० नंतर देशाने निर्णायक आर्थिक वळण घेतले. माहिती व तंत्रज्ञान हे तत्व घेऊन आलेल्या या काळाने सहकार्याऐवजी स्पर्धचे स्वरूप आले.  जीवघेणी मूल्यविहीन स्पर्धा हे या नव्या पर्वाचे लक्षण होते. या साऱ्यांचे पडसाद साहित्यात  पडू लागले असे श्री देशमुख म्हणाले.

या काळात काही साहित्यिकांनी मराठी साहित्याला वेगळे वळण दिले यात. रंगनाथ पठारे यांनी मराठी संस्कृतीचे सखोल आकलन  आपल्या साहित्यातून व्यक्त केले व त्यातून मराठी साहित्य समृद्ध झाले. राजन गवस त्यांनी कृषिजन संस्कृतीचे दर्शन घडविले व भांडवलशाहीच्या काळात माणसं पशुपक्षांना  व माणसांना जगण्याचा अधिकार आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित करणारे लेखन त्यांनी केले. यानंतर प्रवीण दशरथ बांदेकर यांनी भांडवलशाहीने धर्माशी केलेली हातमिळवणी कशी प्रभावी ठरत गेली ती कशी समाजघातक आहे यावर प्रखर भाष्य केले. शरणकुमार लिंबाडे यांचे कादंबरी लेखन हे समृद्ध दलित भान देणारे आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा मराठी साहित्यावर आजही प्रभाव कायम आहे त्यांच्या ‘हिंदू’ या  कादंबरीने या पूर्ण कालखंडाचे युगप्रवर्तक कवी व लेखक म्हणून त्यांची नाममुद्रा मराठी साहित्यावर कोरल्याचे श्री.  देशमुख म्हणाले.

१९९० मध्ये बदलते जग बहुपेढी व्यामिश्र व गुंतागुंतीचे आहे. त्याचे प्रतिबिंब आज साहित्यात  दिसून येत आहे . मात्र,  मराठी साहित्यात नवीन लेखक निर्माण झाले व त्यांच्या लेखनाने परिवर्तनाचा धागा पकडला आहे. याने समाजातील लोकशाहीवाद सजग व बळकट होईल असा विश्वासही श्री देशमुख यांनी व्यक्त केला.