निलंगा उपजिल्हा रुग्णालयात तहसीलदारांनी टाकला छापा

कोरोनाबाधित रूग्णावर उपचारासाठी खासगी मेडीकलमधून औषध आणण्याची सक्ती

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर  कारवाईचा प्रस्ताव

निलंगा ,२७ एप्रिल /प्रतिनिधी 

उपजिल्हा रूग्णालय निलंगा येथे कोरोना रूग्णांवर उपचारासाठी बाहेरून औषधी आणण्याची एका वैद्यकीय अधिकाऱ्यानी सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत आलेल्या तक्रारीवरून सोमवारी ता. 26 रोजी तहसीलदारांनी त्या मेडीकल दुकानवरती छापा टाकून  पावत्या जप्त केल्या आहेत.

सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून अनेक लोकांना वेळेवर उपचार व औषधी न मिळाल्याने प्राण गमवावा लागत आहे. रूग्णालयात रूग्णाची औषधा अभावी हेळसांड होऊ नये म्हणून राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. उपजिल्हा रूग्णालयात कोरोनावर इलाज करणारी मुबलक औषधी असताना देखील येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांच्याकडून शहरातील (खासगी) महाजन मेडिकल मधील औषधी घेऊन या म्हणून सक्ती करत आसल्याची तक्रार एका महिलेने तहसिलदार गणेश जाधव व मुख्याधिकारी मल्लीकार्जून पाटील यांच्याकडे केली.

तहसिलदार व मुख्याधिकारी यानी उपजिल्हा रूग्णालयात या बाबीची चौकशी केली असता कोरोनावर उपचार करणारे औषध  रूग्णालयात असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी श्री. पाटील  खाजगी मेडिकल मधील औषधी का मागवून घेतात याबाबत अधिक तपास केला असता संबंधित वैद्यकीय अधिकारी व महाजन मेडिकल यांची मिलीभगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.तहसीलदारांनी कांही फार्मासिस्ट घेऊन येथील महाजन मेडीकलमध्ये बारकाईने चौकशी केली असाता एक महीण्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे उपलब्ध पावत्यावरून लक्षात आहे. लागलीच छापा टाकून त्या पावत्या जप्त केल्या.

सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी ह्या महाजन मेडिकल असलेल्या दुसऱ्या मजल्यावर खाजगी दवाखाना चालवत असतात त्यामुळेच ते खाजगी मेडिकल मधून औषधी आणण्यासाठी सक्ती करत आसल्याचे सांगितले जात आहे. मदनसुरी ता. निलंगा येथील एका महिलेच्या पतीचे आठ दिवसापूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे. सदरील महिलेच्या वडीलांना पण कोरोनाची बाधा झाल्याने त्याना उपजिल्हा रूग्णालय निलंगा येथे दाखल केले असता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने १३ हजार पाचशे रूपयांची औषधी शहरातील महाजन मेडिकल मधून आणण्यासाठी पावती दिली व ती औषध त्यानी घेऊनही आले. संबंधित महिलेकडे पुन्हा लिहून दिलेली औषध आणण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्या महिलेने थेट तहसिलदार गणेश जाधव यांच्या कडे धाव घेतली व आपले म्हणणे सांगितले. त्यानंतर तात्काळ तहसिलदार यांनी छापा टाकला असता ९०% रूग्णांणा खाजगी मेडिकल मधून औषध आणायला लावल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरील वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी असा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले असल्याची माहिती तहसिलदार गणेश जाधवा यांनी दिली.

याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी दिनकर पाटील यांना संपर्क केला असता ते म्हणाले ,माझा या प्रकरणात काहीच संबध नसून  जाणीवपूर्वक मला यामध्ये गोवले जात असल्याची माहिती त्यानी दिली.