हालगी  लावून कावड नाचविने पडले महागात

अहमदपूर तालुक्यातील कोळवाडी गावच्या २८ शिवभक्तांविरुध्द गुन्हा दाखल

लातूर,२६एप्रिल /प्रतिनिधी  

राज्यासह देशता कोरोना महामरिने थरकाप उडवलेल्यामुळे सध्या कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा अवस्थेतही काही उत्साही शिवभक्तांनी अहमदपूर तालुक्यातील कोळवाडी येथे, बारशीला महादेव मंदिरासमोर शिव पार्वती विवाह सोहळा आणि कावड नाचविण्याचा उद्योग केला. प्रशासनाला याची माहिती मिळताच २८ भाविकांविरुध्द किनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहदपूर तालुक्यात कोळवाडी नावाचे गाव आहे. दरवर्षी बारसेला येथील महादेव मंदिरात यात्रा भरते. तसेच, यावेळी शिव-पार्वती विवाह सोहळा व कावड नाचविण्याची प्रथा आहे. त्यामुळे, गावातील भक्तांनी हालगी  लावून शिव-पार्वती विवाह सोहळ्याची आणि कावड नाचविण्याच्या कार्यक्रमाची ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच, ठरल्या प्रमाणे हे दोन्ही कार्यक्रम कामदा एकादशीच्या दिवशी रात्री १०.३० वाजता गावातील मंदिरासमोर पार पडले. याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाने या उत्साही भाविकांचा शोध सुरु केला आणि २८ जणांना शोधून काढले. त्यात कावड नाचविणारे शिवभक्त बाबुराव दिगांबर दहिफळे, लिंबाजी चुडाजी तांदळे, कृष्णा उर्फ वाग्या मधुकर दहिफळे, ज्ञानोबा रानबा जायभाये, हरीश जयजयराम तांदळे, वडजु मारोती दहिफळे, गोविंद मारोती तांदळे, बाबु महादू दहिफळे, दत्तु वामन दहिफळे, मोतीराम वैजु दहिफळे, वसंत दिगांबर दहिफळे, वसंत कोंडीबा सकट (सर्व. रा. कोळवाडी) व गंगाधर सुरवसे (रा. दगडवाडी) यांच्यासह अन्य दहा ते पंधरा जणांचा समावेश होता. या सर्वांविरुध्द, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचे उलंघन करणे, कोरोना विषाणुचा संसर्ग वाढेल याची जाणीव सतानाही हालगी  लाऊन कावड घेऊन नाचुण स्वत:च्या व इतराच्या जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे आदी कलमांन्वये,पोहेकॉ किशोर नामदेवराव गोखले यांच्या फिर्यादीवरुन किनगाव पोलीसात गुरनं ९८/२०२१ कलम १८८, २६९, २७० भादवी साथीचे रोग प्रतिबंधक २, ३, ४ सह कलम १३५ म.पो.का. सह कोविड -१९ उपाय योजना क्र. ११ अन्वये, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास सोपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ एस. बी. तोपरपे हे करीत आहेत.