समाधान कॉलनी उपकेंद्रावरील 5 हजार वीजग्राहकांना दिलासा

वाळूजहून येणारी वीज बंद झाल्यास छावणीतून होणार पुरवठा

कोरोना संकटातही महावितरणचे युद्धपातळीवर काम

औरंगाबाद,२६एप्रिल /प्रतिनिधी 

महावितरणच्या समाधान कॉलनी उपकेंद्रास वाळूजसोबतच छावणीतूनही वीजपुरवठ्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कोरोनाकाळातही महावितरणने युद्धपातळीवर काम करून खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे या उपकेंद्रावरील 5 हजार ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

          महावितरणचे समाधान कॉलनी येथील 33 केव्ही उपकेंद्र ऑक्टोबर 2019 मध्ये कार्यान्वित झाले. या उपकेंद्राला वाळुज येथील 132 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठ्याचा एकच स्रोत उपलब्ध होता. वाळूज येथून वीजपुरवठा खंडित झाल्यास समाधान कॉलनी उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तसेच पर्यायी वीजपुरवठा घेण्यासाठी कमीत कमी पाऊण तास कालावधी लागत असे. तथापि, महावितरणने छावणी उपकेंद्रातून समाधान कॉलनी उपकेंद्रातून आणखी एक स्रोत सुरू करण्यासाठी एकात्मिक विद्युत विकास योजनेअंतर्गत (आयपीडीएस) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू केले. दरम्यान, कोरोना संकटामुळे विविध निर्बंध लागू असल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ग्राहकांना तसेच निर्बंधामुळे घरात बसलेल्या वीजग्राहकांना दिलासा मिळावा या उद्देशाने महावितरणने अवघ्या दोन आठवड्यात युद्धपातळीवर काम पूर्ण केले. छावणी परिसरातील भूमिगत केबलचे तसेच छावणी उपकेंद्रामधील केबल जोडण्याचे काम पूर्ण करून 23 एप्रिलला समाधान कॉलनी उपकेंद्रास दुहेरी वीजपुरवठा उपलब्ध होईल, अशी सुविधा करण्यात आली. भविष्यात कोणत्याही कारणास्तव  एक 33 केव्ही वीज वाहिनी खंडित झाल्यास, वाहिनीवरील दोषाची खातरजमा करून दुसऱ्या 33 केव्ही वाहिनीवरून अल्पावधी समाधान कॉलनी उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत होणार आहे. या कामामुळे पदमपुरा, बन्सीलालनगर, कोकणवाडी, बनेवाडी, आरटीओ ऑफिस, रेल्वे स्टेशन, जहागिरदार कॉलनी, क्रांतीनगर व समाधान कॉलनी येथील वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

या पर्यायी वीजवाहिनीची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी म्हणून औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी वैयक्तिक लक्ष घालून कामाला गती दिली. सदर कामासाठी अधीक्षक अभियंता (शहर मंडल) बिभीषण निर्मळ, अधीक्षक अभियंता संजय सरग (पायाभूत आराखडा), कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता एस.डी. सातदिवे यांनी परिश्रम घेतले. तसेच याकामी छावणी परिषद व संरक्षण विभागाचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले.