कारागृहातील २९ बंदीवानांना कोरोना झाल्याची खंडपीठाने घेतली दखल

शुक्रवारी सुनावणी होणार

औरंगाबाद : हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील २९ बंदीवानांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या पीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जून रोजी ठेवण्यात आली आहेत
कारागृहातील संबंदित घटनेने कारागृहातील अन्य बंदीवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या बंदीवानांना तातडीने एका वसतिगृहात हलविण्यात आले, तसेच त्याच ठिकाणी कोविड-१९ सेंटर स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शिवाय कैद्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याच वसतिगृहाच्या अन्य खोल्यांमध्ये क्वारंटाइन करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. हर्सूल कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका बंदीवानाला २१ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. या वृत्ताला पोलिस प्रशासनाकडून दुजोरा मिळाला होता. मात्र, कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी आमच्याकडे कोणताही बंदी हा कोरोनाबाधित नसल्याचा दावा केला होता. या प्रकरणात अमायकस क्यूरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून ॲड. संगीता तांबट धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनातर्फे सरकारी वकील डी. आर. काळे काम पाहत आहे.

बाधित रुग्णाला इतर बंदीवानांसोबत ठेवल्याचा आरोप

हत्या प्रकरणातल्या एका आरोपीला २० मे रोजी अस्वस्थ वाटत असल्याने आणि त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने घाटी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याचा कोविड-१९ विषाणू चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. चाचणी घेतल्यानंतरही संशयित बंदीवानाला अलगीकरणात न ठेवता त्याला बंद्यांच्या बराकीमध्ये ठेवले गेले. २१ मे रोजी या बंदीवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तरी कारागृह प्रशासनाने आमच्याकडे कोणताही बंदीवान हा बाधित नसल्याचा दावा केला होता. तो दावा आता महागात पडल्याचे वृत्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published.