ऑक्सिजन एक्सप्रेसमधून महाराष्ट्रात पोहचला ऑक्सिजन

Image
ऑक्सिजन टँकर्सच्या वेगवान वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर

सर्वोच्च स्तरावर ऑक्सिजन एक्सप्रेसवर देखरेख

पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसचे नियोजन ते वितरण

नवी दिल्ली,२४ एप्रिल /प्रतिनिधी 

रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसचे परिचालन आव्हान म्हणून स्वीकारले  आणि कळंबोली ते विशाखापट्टणम आणि पुन्हा नाशिक पर्यंत  ऑक्सिजन एक्सप्रेस चालवली. ज्या क्षणी रेल्वेला द्रवरुपी  वैद्यकीय ऑक्सिजनच्या  टँकरच्या वाहतुकीसाठी विनंती करण्यात आली, ताबडतोब विविध रॅम्प बनवण्यात आले. कळंबोली येथे केवळ  24 तासांमध्ये  रॅम्प बनवण्यात आले. मुंबईत पथकाने केलेले हे काम प्रशंसनीय आहे.

Image

रो-रो सेवेसाठी रेल्वेला घाट विभाग, पुलांवरील रस्ते, बोगदे, वळणं, प्लॅटफॉर्म कॅनोपीज, ओव्हर हेड इक्विपमेंट इत्यादी बाबींचा विचार करून संपूर्ण मार्गाचा नकाशा बनवायचा  होता. कारण यात उंची महत्त्वाची बाब असल्याने रेल्वेने वसईमार्गे नकाशा तयार केला. रोड टँकर टी 1618 चे मॉडेल 3320 मिमी उंचीसह सपाट वॅगन्सवर ठेवणे शक्य असल्याचे आढळले.  मुंबई विभागातील घाट विभागात प्रवासासाठी ओव्हर डायमेंशनल कार्गो (ओडीसी)ला परवानगी नसल्यामुळे वसईमार्गे जाणारा लांब पल्ल्याचा मार्ग आखण्यात आला.

ऑक्सिजन क्रायोजेनिक आणि घातक रासायनिक असल्यामुळे  रेल्वेला अचानक वेग वाढवणे, कमी करणे टाळणे तसेच मधून मधून दाब तपासणे आवश्यक होते,  विशेषत: जेंव्हा ते भरलेल्या अवस्थेत असते. तरीही रेल्वेने ते आव्हान म्हणून स्वीकारले, मार्गाचे नकाशे तयार केले, लोकांना प्रशिक्षित केले आणि हे विशिष्ट आकाराचे टँकर वसई, सूरत, भुसावळ, नागपूर मार्गे विशाखापट्टणम येथे नेले.

कळंबोली ते विशाखापट्टणम  अंतर 1850 किलोमीटरहून अधिक आहे, जे या टँकरने केवळ 50 तासात पूर्ण केले. 100 टनांपेक्षा जास्त एलएमओ (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) असलेले 7 टँकर 10 तासात लोड केले गेले आणि केवळ 21 तासांत नागपुरात परत आणले गेले. काल नागपुरात रेल्वेने 3 टँकर उतरवले आहेत आणि उर्वरित 4 टँकर आज सकाळी 10.25 वाजता नाशिकला पोहोचले आहेत.

रेल्वेद्वारे ऑक्सिजनची वाहतूक रस्ते वाहतुकीपेक्षा  वेगवान आहे. रेल्वेमार्गे  वाहतुकीला  2 दिवस लागतात तर रस्तेमार्गे  3 दिवस लागतात. रेल्वे गाड्या 24 तास धावू शकतात परंतु ट्रक चालकांना थांबे घ्यावे लागतात. ग्रीन कॉरिडोर या टँकरच्या वेगवान वाहतुकीसाठी  तयार केले  होते आणि त्यावर सर्वोच्च पातळीवर देखरेख ठेवण्यात आली होती.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली.