ऑक्सिजन आणि ऑक्सिजन देण्यासाठी आवश्यक साधनांवरील मुलभूत सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर माफ करणार

कोविड संबंधित लसींना मुलभूत सीमा शुल्कातून सूट दिली जाणार

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन आणि ऑक्सिजन देण्यासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

Basic customs duty & health cess to be waived off on oxygen & oxygen  related equipment

नवी दिल्ली,२४ एप्रिल /प्रतिनिधी 

देशातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. वैद्यकीय वापराचा ऑक्सिजन तसेच कोविड रुग्णांवर घरी आणि रुग्णालयात उपचार करण्यासाठी आवश्यक साधने यांचा पुरवठा तातडीने वाढविण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साधनांची उपलब्धता वाढविण्यासाठी सर्व मंत्रालये आणि सरकारी विभाग यांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.   

रेमडेसिवीर औषध आणि त्याचे सक्रीय औषधी घटक यांच्यावरील मुलभूत सीमा शुल्क नुकतेच माफ केले आहे अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची आयात जलदगतीने करण्याची गरज आहे अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. या साधनांचे उत्पादन आणि त्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि त्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन संबंधी साधनांसाठी आवश्यक असलेल्या खालील वस्तूंना मुलभूत सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर यातून आतापासून येत्या तीन महिन्यांपर्यंत संपूर्ण सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय तातडीने अमलात आणला जाईल.

1.   वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन

2.   ऑक्सिजन कॉंन्सन्ट्रेटर तसेच फ्लो मीटर, रेग्युलेटर, कनेक्टर आणि टयुबिंग

3.   व्हॅक्युम प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन आणि प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन ऑक्सिजन प्लांट्स, द्रवरूप किंवा वायुरूप ऑक्सिजन निर्माण करणारी क्रायोजेनिक ऑक्सिजन एयर सेपरेशन युनिट्स

4.   ऑक्सिजन कॅनिस्टर

5.   ऑक्सिजन भरण्याची यंत्रणा

6.   ऑक्सिजन साठविण्याचे टँक, क्रायोजेनिक सिलेंडर्स आणि टँक्स यांच्यासह सर्व ऑक्सिजन सिलेंडर्स

7.   ऑक्सिजन जनरेटर्स

8.   ऑक्सिजनच्या जलवाहतुकीसाठी आयएसओ कंटेनर्स

9.   ऑक्सिजनच्या रस्तेमार्गाने वाहतुकीसाठी क्रायोजेनिक टँक्स

10. ऑक्सिजनची निर्मिती, वाहतुक, वितरण किंवा साठवणीसाठी आवश्यक   साधनांच्या निर्मितीसाठी वर दिलेल्या साधनांचे सुटे भाग

11. ऑक्सिजन निर्मिती करू शकेल असे दुसरे कोणतेही साधन

12. व्हेन्टिलेटर्स (उच्च प्रवाहसाठी साधन म्हणून वापरण्याची क्षमता असणारे) तसेच नेजल कॅन्युला, सर्व जोडण्या आणि टयुबिंग असणारे कॉम्प्रेसर्स

13. उच्च प्रवाहासाठी योग्य नेजल कॅन्युला आणि त्याच्या सर्व संलग्न वस्तू

14. नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेन्टिलेशनसाठी शिरस्त्राण

15. अतिदक्षता विभागातील व्हेन्टिलेटरसाठी नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेन्टिलेशनकरिता वापरण्यात येणारा नाक-तोंडाचा मास्क

16. अतिदक्षता विभागातील व्हेन्टिलेटरसाठी नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेन्टिलेशनकरिता वापरण्यात येणारा नाकाचा मास्क

वर दिलेल्या वस्तूंखेरीज, येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत आयात करण्यात येणाऱ्या कोविड लसीवर असलेले मुलभूत सीमा शुल्क देखील तातडीने माफ करण्यात आले आहे.

या सर्व उपाययोजनांमुळे या वस्तूंची उपलब्धता वाढेल तसेच त्या स्वस्त दरात मिळू शकतील. या साधनांच्या आयातीला त्वरित आणि विना अडथळा सीमा शुल्क विभागाकडून मंजुरी मिळण्याची खात्री करून घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी महसूल विभागाला दिले आहेत. त्यानुसार, वर उल्लेख केलेल्या वस्तूंच्या आयातीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल विभागाने संयुक्त सचिव गौरव मसाल्दन यांनी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

भारत सरकारने गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साधनांचा पुरवठा वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. भारतीय हवाई दलाची विमाने सिंगापूर येथून क्रायोजेनिक ऑक्सिजन टँक्स देशात आणत आहेत. ही विमाने ऑक्सिजन टँक्सच्या वाहतुकीचा वेळ वाचविण्यासाठी त्यांची देशांतर्गत वाहतूक देखील करीत आहेत.  

त्याचप्रमाणे, काल घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार, देशातोल 80 कोटी भारतीयांना येत्या मे आणि जून या महिन्यांमध्ये सरकारतर्फे मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री, वाणिज्य आणि उद्योगमंत्री, आरोग्य मंत्री, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, नीती आयोगाचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया  तसेच महसूल, आरोग्य आणि उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत भाग घेतला.