उच्च शिक्षणाला जागतिक आयाम देणारा महाराष्ट्रपुत्र गमावला!

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

पुणे,२३ एप्रिल /प्रतिनिधी 

विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) माजी अध्यक्ष, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर (वय- ७९) यांचे आज(शुक्रवार) पुण्यात राहत्या घरी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.

१९९८ ते २००० या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर कार्यरत होते. यानंतर २००० ते २००५ या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते. याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘नॅक’चे ते संस्थापक संचालक देखील होते.

भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांच्या निधनामुळे आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर बहूआयामी होते. विनयशील स्वभावाच्या डॉ.निगवेकर यांनी पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ, कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही शिक्षण क्षेत्रात विद्यार्थीभिमुख असे काम केले. भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण प्रवाह आणण्यासाठी त्यांनी ‘नॅक’ सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केला. देशातील संगणक तंत्रज्ञान आणि नागरी सेवा क्षेत्रातील शिक्षणाच्या दर्जात्मक सुधारणेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.  भारतातील उच्च शिक्षणाला जागतिक आयाम देणारा महाराष्ट्रपुत्र आपण डॉ. निगवेकर यांच्या निधनामुळे गमावला आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.