शिवजयंती पर्यंत तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करा-आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद,२३ एप्रिल /प्रतिनिधी 

शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवून याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र या पुतळा उभारणीच्या कामास विलंब होत असून निदान येणार्‍या शिवजयंतीपर्यंत तरी सदरील पुतळ्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.23) महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांड्ये यांच्याकडे केली आहे.

May be an image of text

          मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे की, 19 फेब्रुवारी 2018 शिवजयंतीचे औचित्य साधून मोठा गाजावाजा करीत महानगरपालिकेने सदरील कामाचे भूमिपूजन केले. मात्र भूमिपूजन होऊन तीन वर्ष झाली तरी पुतळा उभारणी कामात महानगरपालिकेकडून दिरंगाई होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यासंदर्भात 19 जानेवारी 2013 रोजीच्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र जवळपास सहा वर्ष हा प्रस्ताव तसाच धूळ खात पडून होता. ज्या छत्रपती शिवरायांनी आपले उभे आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी खर्च केले त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढावी यासाठी मी माझा आमदार निधी देण्यास तयार होतो. फक्त महानगरपालिकेने या कामासाठी अभियंत्यामार्फत खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून त्याची प्रत मला द्यावी अशी मागणी मी केली होती. त्यावेळी महानगरपालिकेने हा विषय अस्मितेचा केला असे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

मागील तीन वर्षांपासून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रांती चौकात लवकर उभारावा अशी महानगरपालिकेची इच्छा नाही का?, शिवप्रेमींचा रोष शांत करण्यासाठी आपण भूमीपूजन केले होते का?, महाराजांचा पुतळा उभारणीसाठी लागणारा पैसा महानगरपालिकेकडे नाही का?, सदरील कामाची निविदा प्रकि‘या केव्हा निघाली?, कंत्राटदाराने किती तारखेपर्यंत हे काम पूर्ण करून देणे अपेक्षीत होते?, सद्य:स्थितीत पुतळा उभारणीचे काम किती झाले?, किती दिवसात हे काम पूर्ण होईल? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी पत्राव्दारे उपस्थित केले आहेत.