उमरगा रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक उभारणीस मंजुरी

उमरगा ,२३एप्रिल /प्रतिनिधी 

येथील उपजिल्हा रुग्णालयात  600 LPM क्षमतेचे ऑक्सिजन टॅंक उभारणीस मंजुरी मिळाली असून ,रोज १२५ जंबो सिलेंडर भरण्याची क्षमता असेल तर ह्याकरिता एक कोटी २० लाख खर्च येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली .

May be an image of 1 person
आमदार ज्ञानराज चौगुले

     उमरगा व लोहारा तालुक्यात मागील एक वर्षापासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ,अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.परंतु आवश्यक क्षमतेच्या तुलनेत ऑक्सिजन साठा कमी पडत असल्याने अनेक रूग्णांची गैरसोय होत आहे. 
उमरगा व लोहारा तालुक्यासाठी आवश्यक ऑक्सिजन सिलेंडर तामलवाडी ता.तुळजापूर येथून येथील केंद्रातून रिफिल करून मिळतात.परंतु या ठिकाणी कमी क्षमता असल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत होती .यामुळे मागील आठवड्यापासून उमरगासाठी  लातूर व जालना येथून ऑक्सिजन रिफिल करून मिळण्याची परवानगी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आ.ज्ञानराज चौगुले यांनी घेतली होती. परंतु सध्या सर्वत्रच रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची कमालीची कमतरता भासत आहे. ही गरज ओळखून उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे 600 LPM  क्षमतेचे ऑक्सिजन टॅंक उभारणीबाबत परवानगी मिळणेबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवणेबाबत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना 13/09/2020 रोजी पत्राद्वारे मागणी केली होती व या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता व यास मंजुरी मिळण्यासाठी आ.ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र शासनाचे औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली होती. यानुसार आज या प्लांटला मंजुरी देण्यात आली. सदर प्लांट हा दोन ते तीन आठवड्यात चालू होणार अशी माहिती आ.चौगुले यांनी दिली.यामुळे भविष्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होणार नाही.