नाशिक ऑक्सिजन गळती : अज्ञात व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

सर्व रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकची नियमित देखभाल- दुरूस्तीसह पर्यायी ऑक्सिजनची व्यवस्था करावी-पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक, २२ एप्रिल /प्रतिनिधी

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हलगर्जीपणा करत इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी भादवी ३०४-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या घटनेची चौकशी करणार आहे. ही घटना घडल्यानंतर ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ गायब होते. पुण्यातील टाय निप्पॉन सो या कंपनीला काम देण्यात आले होते.

May be an image of one or more people, people sitting and indoor

रेमडेसिव्हिरचे गरजूंना निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वितरण करण्यात यावे-पालकमंत्री छगन भुजबळ

डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल मधील ऑक्सिजन लिकेजच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी सर्व आरोग्य यंत्रणांनी भविष्यात घेणे गरजेचे आहे, तसेच जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांमधील ऑक्सिजन टॅंकची नियमित दुरूस्ती व देखभाल करण्याबरोबरच राज्याकडून जिल्ह्याला रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स टप्प्याटप्प्याने मिळणार असून जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील गरजूंना त्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यरद्धतीप्रमाणे वितरण करण्यात यावे, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

काल नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल मधील दुर्घटनेच्या व आज रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर भुजबळ फार्म येथील आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, कोरोना सांख्यिकी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, सहाय्यक संचालक माधुरी पवार, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना देखभाल, दुरूस्त सोबतच ड्युरा व जम्बो ऑक्सिजन सिलेंडरचीही व्यवस्था करण्यात यावी. सर्व ऑक्सिजन टॅंक भरण्यासाठी पाठवताना सोबत पोलीस पथकाची सुरक्षा देण्यात यावी. कुठल्याही रूग्णालयात रूग्णांना अत्यावश्यक सेवा, सुविधा, ऑक्सिजन, औषधे कमी पडणार नाहीत याची काळजी सर्व प्रशासनाने घ्यावी. त्याचप्रमाणे मनुष्यबळ वाढविण्यासाठी सेवानिवृत्त, मानवतेच्या भावनेतून स्वतःहून काम करणाऱ्या अनुभवी डॉक्टर्स व परिचारिका यांना प्राधान्य देऊन त्यांची मानधन तत्वावर भरती करण्यात यावी, असे महानगरपालिका आयुक्त श्री. जाधव यांना पालकमंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले.

वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांसोबत अनेक नातेवाईक देखील येतांना दिसतात, त्यांच्यावर बंधन आणणे आवश्यक आहे. बाधित रुग्णासोबत आलेल्या व्यक्तिंच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढतो व त्याच्यामार्फत इतरही लोक बाधित होतात. यावर निर्बंध आणण्यासाठी सर्व कोविड रुग्णालयांच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या सोबत त्यांच्या नातेवाईकांना येण्यास सक्त मनाई करण्यात येऊन पोलीस यंत्रणेच्या मदतीने कोविड रुग्णालय परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत. तसेच राज्य शासनाने आजपासून लागू केलेल्या निर्बंधांची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना देखील यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.