हॉटेलचालकाचा दगडाने ठेचून खून ,तीन आरोपी ताब्यात 

उधारी  मागितल्यामुळे केला खून 

उमरगा,२२एप्रिल /नारायण गोस्वामी
शहरातील  मुळज रोडलगत  बुधवारी दि.21 रोजी पहाटेच्या वेळी ,तेथील नागरिकांना एक दगडाने चेहरा विद्रुप केलेला मृतदेह नजरेस पडल्याने एकच खळबळ उडाली.या प्रकरणी मृत  भावाच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या घटनेनंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षकानी घटनास्थळी भेट दिली तसेच श्वानपथकामार्फत आरोपीचा माग घेण्यात आला.

मृत आकाश अबाचणे याचा लहान भाऊ राजेंद्र दत्तात्रय अबाचणे वय-21रा काळे प्लॉट उमरगा याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,मयत आकाश दत्तात्रय अबाचणे वय-25 रा.काळे प्लॉट हा मुळज रोड परिसरात हॉटेलचा व्यवसाय करीत होता.त्याच्या हॉटेलमध्ये आरोपी रोहित चुंगे व आकाश धोत्रे हे चहा पिऊन जात व पैसे देत नसत.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मयत आकाशचे हॉटेल बंद होते.मयत आकाश हा रोहित चुंगे व आकाश धोत्रे यांना उधारीचे पैसे मागत होता.तू आम्हाला पैसे कसे मागितले म्हणून या दोघा आरोपीनी त्यास शिवीगाळ केली होती तसेच 18 एप्रिल रोजी रात्री मृत  आकाशच्या घरी येऊन आकाश,त्याची आई व भावास शिवीगाळ करीत मारहाण केली होती.यावेळी या दोन आरोपिसोबत व्यकंट धोत्रे सुद्धा होता.यावेळी घाबरून आकाश ने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती.मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मयत आकाश हा घरी जेवण करून रूमवर झोपण्यासाठी गेला होता.बुधवारी दि.21रोजी  सकाळी पहाटे फिर्यादी राजेंद्र यास त्याचा चुलत भाऊ कुमार आबाचणे याने मोबाईल वर तुझ्या भावाचा मुळजरोड जवळ पालिकेच्या दुकान गाळ्यासमोरील मोकळ्या जागेत दगडाने खून केल्याची माहिती दिली.तरी माझ्या भावाचा हॉटेलच्या उधारी मागण्याबरून आरोपी रोहित चुंगे,आकाश धोत्रे,व्यकंट धोत्रे,प्रशांत पुरातले (सर्व रा.उमरगा )व विकास जाधव (रा.तुरोरी) यांनी मिळून माझ्या भावाचा खून केला आहे.या फिर्यादीवरून उमरगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी व्यकंट धोत्रे,विकास जाधव व प्रशांत पुरातले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रोहित चुंगे व आकाश धोत्रे हे दोन आरोपी फरार आहेत.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे हे करीत आहेत.
बुधवारी सकाळी एक इसमाचा दगडाने ठेचून खून झाल्याच्या घटनेची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले,  सहाय्यक पोलिस निरीक्षक  सिद्धेश्वर गोरे,उपनिरीक्षक अमोल मालुसरे, रमाकांत शिंदे हे  पथकासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.यावेळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला व नातेवाईकांच्या आरोपावरून संशयित तीन आरोपींना अटक केली.दुपारी एकच्या सुमारास अप्पर पोलिस अधीक्षक संजय पालवे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.तसेच उस्मानाबाद येथून  दुपारी श्वानपथक आल्यानंतर घटनास्थळी श्वान नेऊन घटनास्थळी सापडलेल्या चपलेचा वासावरून माग काढण्यात आला यावेळी श्वानाने संशयित आरोपीच्या घरापर्यंत माग काढला.दिवसभर मृताच्या  नातेवाईकांनी  पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी  ठिय्या मांडला होता . सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत  भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.