कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणार – पालकमंत्री संदिपान भुमरे

यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या तसेच मृत्यूचा आकडासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी शासन-प्रशासन एकजुटीने काम करीत असून कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील, असे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

नियोजन सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष कालिंदा पवार, खासदार भावना गवळी, खासदार बाळू धानोरकर, विधानपरिषद सदस्य सर्वश्री आमदार वजाहत मिर्झा, दुष्यंत चतुर्वेदी, निलय नाईक, विधानसभा सदस्य आमदार संजय राठोड, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी आणि मृत्यूदर कमी करायचा असेल तर टेस्टिंग आणि लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री भुमरे म्हणाले, ग्रामीण स्तरापर्यंत उपचाराची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. तसेच डॉक्टरांची उपलब्धता होण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सीजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 ऑक्सिजन बेड व 10 व्हेंटिलेटर पुढील आठवडाभरात सुरू करण्याचे नियोजन आहे. स्त्री रुग्णालय येथे 100 बेड, उमरखेड ग्रामीण रुग्णालयात आठवडाभरात 30 ऑक्सिजन बेडची व्यवस्था, वणी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात आठ ठिकाणी पीएसए ऑक्सीजन प्लाँट बसविण्यात येणार आहे. नियोजन समितीच्या निधीतून 16 तालुक्यासाठी 16 सुसज्ज रुग्णवाहिका घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा नियमित वापर, सामाजिक अंतराचे पालन, वारंवार हात धुणे, लक्षणे आढळताच चाचणी करणे, पात्र नागरिकांनी लसीकरण करणे या पंचसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी त्यांनी एकूण रुग्णसंख्या, सद्यस्थितीत असलेले ॲक्टिव्ह पेशंट, बेडची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा, नियमित होणारे टेस्टिंग आणि ट्रेसिंग आदींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वाघापूर रोडवरील कोविड केअर सेंटर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी मानले. बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार व आमदारांनी अनेक सूचना केल्या. यात टेस्टिंगची संख्या वाढविणे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये सर्व सोयीयुक्त करणे, शासनाच्या सुचनेप्रमाणे बीएएमएस आणि बीएचएमएस तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांची सेवा घेणे. प्रसंगी या विद्यार्थ्यांचे मानधन वाढविणे, कंपन्याचा सीएसआर फंड केवळ कोरोनाच्या कामाकरिता वापरणे, रेमडेसिवीर कोणाला आवश्यक आहे व कोणाला नाही, याबाबत जनजागृती करणे आदी सूचनांचा समावेश होता.