परभणीत कोविड सेंटरच्या परिचरिकेकडून ‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार, दोघांना अटक

परभणी,२०एप्रिल /प्रतिनिधी

गंभीर कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या एका परिचारिकेकडूनच होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सदर परिचारिकेसह तिच्या  सहकार्‍याला अटक करून इंजेक्शन्स आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, सदर परीचारिकेने यापूर्वी 7 इंजेक्शन चोरून ते काळ्या बाजारात विकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी सापळा रचला होता. त्यानुसार पोलिस शिपाई संतोष सानप यांनी ठरल्याप्रमाणे इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या व्यक्तीला भेटून ‘माझा नातेवाईक कोरोनाचा रुग्ण असून, तो गंभीर आहे. त्याला इंजेक्शनची गरज आहे’, असे विश्वासात घेऊन बोलणी केली असता, त्याने पंधरा हजार रुपये किमतीला एक इंजेक्शन असून, तीस हजार रुपयात दोन इंजेक्शन घेऊन येतो, असे त्याने सांगितले’. त्यानुसार पोलिस शिपाई सानप यांनी ही माहिती सपोनि आलेवार यांना कळवली. त्यानंतर सदर माहिती वरून पोलिस पथक 2 दोन पंचासह शहरातील बेलेश्वर मंदिराजवळ दबा धरून बसले. तांत्रिक साहाय्य करण्याबाबत सायबर पोलीस कक्षाच्या कर्मचाऱ्याला सांगितले होते. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी तो व्यक्ती बेलेश्वर मंदिराजवळ पायी चालत आला. ठरल्याप्रमाणे रेमडिसिव्हर इंजेक्शनबद्दल बोलू लागला. तो बोलत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव दत्ता शिवाजी भालेराव (वय 21 वर्षे, व्यवसाय- नर्सिंग स्टाफ डेंटल कॉलेज पाथरी रोड परभणी, मुळ राहणार- कुऱ्हाडी तालुका पूर्णा) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन पंचा समक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून दोन रेमडेेसिविरचे इंजेक्शन, एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. 

Displaying IMG-20210420-WA0098.jpg

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता, सदर इंजेक्शन त्याने सिव्हिल हॉस्पिटल येथील परिचारिका नीता केशव काळे हीच्याकडून बारा हजार रुपयांना एक याप्रमाणे ते घेतल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ परिचारिका नीता काळे हिला ताब्यात घेतले. तिच्या खोलीची झडती घेतली असता, 75 हजार रुपये रोख रक्कम सापडली. तसेच तिने आतापर्यंत 7 इंजेक्शन जिल्हा परिषद सेंटर येथून चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या ती त्याच कोविड सेंटरला काम करीत होती. तिच्याकडून एक मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात औषध निरीक्षक बळीराम मरेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.