ब्रुक फार्मा कंपनीचा मालक पोलिस ठाण्यात, त्यांच्या वकिलीसाठी देवेंद्र फडणवीस का जात आहेत ?-मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवारपासूनच राज्य विरुद्ध केंद्र सरकार, अशी लढाई सुरू आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केले, त्यानंतर केंद्र सरकारनेही त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, या प्रकाराचे राजकारण शनिवारी रात्री उशीरा पोलिस ठाण्यात पहायला मिळाले. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला १०-१२ पोलीसांनी उचलून आणून कारवाई केली.रेमडेसीवीर सरकारला मिळू नये अशी भूमिका भाजप घेत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. भाजपचे प्रमुख नेते पोलीस ठाण्यात का गेले ? हे स्पष्टीकरण द्यावे. साठा या लोकांकडे असल्याचे ते म्हणाले.

राज्यात रेमडेसीवीरचा तुटवडा असून उत्पादन करण्यास परवानगी असून निर्यातीवर बंदी आहे. 7 कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी असताना रेमडेसीवीर विकण्याची परवानगीसाठी सरकारला विचारणा केली गेली. ब्रूक फार्माचे मालक FDA आयुक्तांना भेटल्याची माहिती मलिक यांनी दिली. साठा आहे, पुरवठा करु शकतो याबाबत त्यांनी चर्चा केली.

यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप करत या प्रकाराची पोलखोल केली. एका मंत्र्यांच्या सीओडींनी फोन केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते यांनीही टीका केली आहे. राजेश डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप घाबरते का, त्यांच्या वकीलीसाठी देवेंद्र फडणवीस का जात आहेत, ते बाजू का मांडत आहेत, असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.

नवाब मलिक म्हणाले, “देशामध्ये सात कंपन्यांना रेमडेसिवीरच्या देशांतर्गंत वाटप आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे. दोन कंपन्यांना पदरेशात विक्रीची परवानगी आहे. त्याउलट सात कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विकण्याची परवानगी द्या, यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत आहेत.”

ज्याचं करावं भलं…
 
ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न आणि औषध मंत्री राजेंद्र शिंगणे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना भेटले होते. त्यांनी माहिती दिली की, माझ्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे, मला परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो, अशी माहिती दिली होती. कंपनीकडे असलेल्या साठ्या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा आहे, त्या आधारे राजेश डोकानिया यांना रात्री पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी सुरू करण्यात आली.

मलिक यांनी काय आरोप केले ?
 
“देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे सर्वजण रात्री सव्वा अकरा वाजता वांद्रे कुर्ला संकुल येथे पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर पोलीस त्यासंदर्भातील चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? रेमडेसिवीरचा साठा स्वतः कडे घेण्यासाठी आणि साठा सरकायला देऊ नका अशी भूमिका भाजप नेत्यांची आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
खुलासा करण्याची मागणी
 नवाब मलिक म्हणाले की, “पोलीस यंत्रणा जनतेसाठी काम करतेय, यंत्रणा काळा बाजार रोखण्याचे काम करतेय. पण डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप का घाबरते ? भाजप त्यांच्या वकिलीसाठी का जात आहे? फडणवीस वकील आहेत, ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते? की त्यांचे संबंध आहेत म्हणून त्यांची बाजू मांडत होते? जर महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी बोलावलं असेल तर भाजपाचे प्रमुख नेते तिकडे जातात, यावरुन काय संबंध आहेत हा खुलासा केला पाहिजे.”