रेमडेसिविर इंजेक्शनची अवैधरित्या रित्या चढ्या भावाने विक्री,चौथ्या आरोपीला अटक   

औरंगाबाद,१८एप्रिल /प्रतिनिधी 

रेमडेसिविर इंजेक्शनची अवैधरित्या रित्या चढ्या भावाने विक्री केल्या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी चौथ्या आरोपीला रविवारी दि.18 पहाटे बीड येथुन अटक केली. दिपक सुभाषराव ढाकणे (32, रा. रेणुका मेडीकल, एजन्सी यशोदा कॉम्पलेेक्स अंबीका चौक, पांगरी रोड बीड) असे आरोपीचे नाव आहे.  तर गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मंदार भालेराव, अभिजीत तौर, अनिल बोहते या तिघा आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने चारही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना मंगळवारपर्यंत दि.20 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले.

या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल बजाज (55) यांनी फिर्याद दिली.  गुरुवारी दि.15 रोजी पुंडलीक नगर पोेलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम  सोनवणे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी  तिघा आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून रेमडेसिवीर, मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त केला.

 कोठडीदरम्यान तौर याने सदरील इंजेक्शन हे बीड येथील दिपक ढाकणे याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी ढाकणे याला रविवारी पहाटे अटक केली. आरोपी ढाकणेची चौकशी केली असता त्याने तौर आणि तो एकाच डी फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी आहोत त्यामुळे आमची मैत्री होती. तौर याच्या सांगण्यावरुन बीड येथील दत्ता गात (ब्रदर) याच्याकडून एक रेमडेसिवीर इंजेक्शन घेवून तौर याला १२ हजारात दिल्याचे कबुल केले.

चौघा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी रेमडीसिवीर इंजेक्शन ढाकणे यांना देणारा ब्रदर दत्ता गात याला अटक करणे आहे. तसेच दत्ता गात याने आणखी रेमडेसिवरी दिले आहेत काय याचा तपास बाकी आहे. आरोपी अनिल बोहते याचा मिनी घाटीतील अहवाल येणे बाकी आहे. बरोबरच रेमडेसिवीरसाठी पंंटरने दिलेले पैसे आरोपी भालेराव मार्फत तौर याने ढाकणेला दिले आहे. ते पैसे जप्त करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.