अवैध देशी दारू विक्री अड्ड्यावर तहसीलदारांची धाड

पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियता  उघड

निलंगा ,१७एप्रिल /प्रतिनिधी 

निलंगा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अण्णाभाऊ साठे नगरात अवैधरित्या देशी दारू विक्री होत असल्याची माहिती  मिळताच तहसीलदार गणेश जाधव यांनी   पोलिस फौजफाटासह  शनिवार दिनांक. 17 रोजी दुपारी अवैध दारू विक्री आड्यावर धाड टाकून नऊ बॉक्स देशीदारू पकडली. याप्रकरणी संबंधितावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  तहसीलदारांनीच  अवैध दारू पकडल्यामुळे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियता उघडकीस आली आहे.  

सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी जाहीर केली आहे. त्यातच जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील बार व रेस्टारंटही बंद करून दारू विक्री थांबवली आहे.  तरीही निलंगा तालुक्यासह शहरातील विविध भागात  संचारबंदी काळात राजरोसपणे देशी व विदेशी दारूची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अर्थपूर्ण बोलणी करून जाणीवपूर्वक  दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा या भागातील नागरिकांची आहे.  संचारबंदी व जमावबंदी काळात त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले जात आहे. 

निलंगा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर भागात सतिश निळकंठ सगर व सुभाष लक्ष्मण जाधव हे दोघे आपल्या राहत्या घरी अवैध देशी दारू विक्री करत असल्याची माहिती तहसिलदार गणेश जाधव यांना या भागातील नागरिकांनी दिली.  तहसीलदारांनी तातडीने कारवाई करीत पोलिस  फौजफाटा सोबत घेऊन  अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या दोन व्यक्तीच्या घरावर धाड टाकून ४५१ बाटल्या (नऊ बाॕक्स देशी दारू) ताब्यात घेतले . यावेळी पोलीस निरीक्षक अनिल चोरमले , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता गायकवाड आदी उपस्थित होते.   सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रणिता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीवर अवैध दारू विक्री करणे व बाळगणे अंतर्गत निलंगा पोलिस ठाण्यात सतीश निळकंठ सगर व सुभाष लक्ष्मण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता गायकवाड व पोलिस शिपाई प्रणव काळे हे करत आहेत.

खुद्द तहसीलदारांनीच ही कारवाई केल्याने अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले असून कोरोना काळात देखील शहरात असा अवैध देशी दारू साठा सापडल्याने अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. संपूर्ण शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधीत रूग्णाची संख्या वाढत असताना अवैध दारू विक्री करणारे मात्र चढ्या भावाने दारू विक्री करून आपले उखळ पांढरे करत आहेत. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आड्यावर धाड टाकून प्रशासनाने अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.