राज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला शिवभोजन थाळीचा मोठा आधार

गरीबांचे पोट भरणाऱ्या ‘शिवभोजन’वर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पाहावी – अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ  

May be an image of 1 person, standing, outdoors and text that says 'TESA M . Shot on OnePlus By Shivraj Lute'

मुंबई, दि. 16 : दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा काळात मजूर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. काल पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागाने काल मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेशदेखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी अशी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीदेखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिलेल्या आहेत.

May be an image of 1 person, standing and text that says 'W Shot .OP on OnePlus By Shivraj Lute'

संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे अशा  गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान वाटत असल्याची भावनादेखील श्री भुजबळ यांनी व्यक्त केली.

शिवभोजन थाळीबद्दल माहिती देतानाच या योजनेवर टीका करणाऱ्यांचा समाचारदेखील श्री भुजबळ यांनी घेतला आहे. गेले अनेक दिवस समाज माध्यमांवर शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे मात्र गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पाहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावे असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.