देशातील 10 राज्यांमधील, 38 जिल्हे आणि 45 महापालिका क्षेत्रात कोविड-19 च्या रुग्णांचे लक्षणीय प्रमाण,औरंगाबादचा समावेश चिंताजनक

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे निर्देश  

नवी दिल्ली, 8 जून 2020

केंद्रीय आरोग्य सचिव, प्रीती सुदान आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी, राजेश भूषण यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून, कोविडविषयक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. देशातील 10 राज्यांमधील, 38 जिल्हे आणि 45 महापालिका क्षेत्रात कोविड-19 च्या रुग्णांचे लक्षणीय प्रमाण असून, या जिल्ह्यातील, जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, या बैठकीत सहभागी झाले होते.यामध्ये औरंगाबाद महापालिकेचा समावेश असल्यामुळे स्थिती चिंताजनक आहे. 

महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या राज्यांतले हे सर्व जिल्हे आहेत.

या बैठकीत, प्रामुख्याने, शहरी भागातील घनदाट वस्तीत-जिथे सार्वजनिक सोयी-सुविधा वापरल्या जातात-वाढणारा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर चर्चा झाली. या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, त्वरित चाचण्या आणि अलगीकरण, तसेच रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रतिबंधक धोरण या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

राज्याच्या अधिकाऱ्यांना प्रतिबंधक क्षेत्रातील उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच बफर झोनमध्ये निरीक्षण आणि कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी पाळायचे नियम आणि सवयींची माहिती जनतेला वारंवार देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी काय काळजी घेतली जावी, याची माहितीही अधिकाऱ्यांना देण्यात आली. यात, संसर्गित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतांना संसर्गाचा अति धोका असलेल्या व्यक्तीना तसेच दुर्बल घटक म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देणे; निरीक्षण उपाययोजना अधिक प्रभावी करणे, पुरेशा चाचण्या करणे आणि लक्षणे गंभीर होण्यापूर्वीच, रुग्णांना योग्य ते उपचार देणे, अशा उपाययोजना होत्या.

कोविड-19 च्या प्रतिबंधनासाठी पायाभूत आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्धतेविषयी झालेल्या चर्चेत, अशी सूचना करण्यात आली की आरोग्य पायाभूत सुविधांसाठी पुरेसे नियोजन केले जावे, पुरेशी निरीक्षण पथके उपलब्ध केली जावीत आणि खाटांच्या व्यवस्थापनासाठी, एक यंत्रणा कार्यान्वित केली जावी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक मदत घेण्यासाठी एक उत्कृष्टता केंद्र सुरु केले जावे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची तिथे नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधांविषयी माहिती देण्यात यावी.

प्रत्यक्ष प्रशासकीय जबाबदाऱ्यांविषयी बोलतांना, महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना पुढाकार घेऊन महापालिकांच्या सर्व पायाभूत सुविधांचा वापर प्रतिबंधन उपाययोजनांसाठी केला जावा, यासाठी, ‘सर्वसमावेशक दृष्टीकोन’ ठेवावा, असा सूचना देण्यात आल्या.कोविड-19 च्या प्रतिबंधनासोबतच, नियमित आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा देखील उपलब्ध असाव्यात, यावर यावेळी भर देण्यात आला.

असे भाग, ज्यांच्याकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यात, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन रुग्ण शोधणे, सर्वेक्षण पथकांची व्यवस्था, रुग्णवाहिकेचा प्रभावी उपयोग, रुग्णालयात, रुग्णांवरील उपचारांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि खाटांचे व्यवस्थापन, रुगणालयात असलेल्या रूग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी, चोवीस तास, पाळ्यांमध्ये वैद्यकीय चमूंची उपलब्धता असणे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी ठेवणे, यासाठी चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळण्याची व्यवस्था व वेळेत उपचारांची सोय करावी. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात जनजागृती आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी, असा सल्लाही या बैठकीत देण्यात आला. बफर झोनमध्ये SARI किंवा ILI चे रुग्ण शोधण्यासाठी ताप तपासणारे दवाखाने सुरु ठेवावेत. आता लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आलायामुळे, कोविड प्रबंधणासाठी, राज्यांनी, येत्या काही महिन्यासाठीच्या तयारीची जिल्हानिहाय योजना तयार करावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

आतापर्यंत देशभरात, कोविडचे 1,24,430 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात, 5,137 रुग्ण बरे झाले. यामुळे सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर, 48.49% इतका आहे. सध्या उपचाराखाली असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 1,24,981 इतकी आहे.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: [email protected] आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- [email protected] .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *