लसीकरण उत्सवात 1.28 कोटीहून जास्त मात्रा

नवी दिल्ली ,15 एप्रिल /प्रतिनिधी 

कोविड- 19 चा धोका जास्त असलेल्या वयोगटातल्या लोकांचे  या विषाणू विरोधात लसीकरण करण्याच्या प्रयत्नात भारत मोठी प्रगती करत आहे. 11 ते 14 एप्रिल या काळात लसीकरण उत्सव करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले हाक लक्षात घेऊन, खाजगी आणि सार्वजनिक कामाच्या ठिकाणी अनेक कार्यस्थळ लसीकरण केंद्रे( सीव्हीसी)  कार्यान्वित झाल्याचे दिसून आले. कोणत्याही दिवशी सरासरी  45,000 सीव्हीसी कार्यान्वित असल्याचे दिसून आले. लसीकरण उत्सवाच्या पहिल्या दिवशी 63,800, दुसऱ्या दिवशी 71,000, तिसऱ्या दिवशी 67,893 तर चौथ्या दिवशी 69,974 सीव्हीसी कार्यरत होती. सर्वसाधारणपणे, रविवारी लसीकरण झालेल्यांची संख्या कमी (सुमारे 16 लाख) असते मात्र लसीकरण उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 27 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

चार दिवसांच्या या लसीकरण उत्सवात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. 11 एप्रिलला 29,33,418 मात्रा तर दुसऱ्या दिवशी 40,04,521 मात्रा देण्यात आल्या. 13 एप्रिलला 26,46,528  आणि 14 एप्रिलला  33,13,848 मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण उत्सवात पात्र वयोगटातल्या लोकांना लसीच्या  1,28,98,314 मात्रा देण्यात आल्या.तीन राज्यानी आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र (1,11,19,018), राजस्थान (1,02,15,471) आणि उत्तर प्रदेश (1,00,17,650) यांचा यात समावेश आहे.