चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी आज चैत्यभूमी येथे अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण केले.

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व इतर मान्यवरांनी देखील अभिवादन केले.

वर्षा निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथील समिती कक्षात डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

राज्यपालांचे अभिवादन

चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. 14 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, समन्वय समितीचे नागसेन कांबळे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वज्ञानी होते. जगातील सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून त्यांनी सर्वोत्तम अशी भारताची राज्यघटना बनवली. समाजातील उपेक्षितांना न्याय दिला. डॉ.बाबासाहेबांच्या पुस्तकांचे वाचन करून त्यातून प्रेरणा घेऊन डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत बनवूया.

यावेळी खासदार राहुल शेवाळे लिखित “काळाच्या पलीकडचे महामानव” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच राज्यपाल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बौद्ध धर्मगुरूंना चिवरदान करण्यात आले.