जालना जिल्ह्यासाठी दहा हजार रेमेडिसेंविर इंजेक्शन उपलब्ध

ऑक्सिजनसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित: घनसावंगी तालुक्यात मॉडेल म्हणून राबवणार-पालकमंत्री राजेश टोपे यांची माहिती

जालना दि 14 – गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमेडिसेंविर इंजेक्शनची कमतरता भासू नये या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यासाठी दहा हजार रेमेडिसेंविर इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालना शहरातील बडीसडक परिसरात असलेल्या करवा मेडिकल एजन्सी येथे खाजगी रुग्णालयांना प्रातिनिधिक स्वरूपात रेमेडिसेंविर इंजेक्शनच्या वाटप प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.

यावेळी यावेळी आमदार कैलास गोरंट्याल , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या श्रीमती अंजली मिटकर, डॉ.प्रताप घोडके,बबलु चौधरी,करवा एजन्सीचे बिरज मोतीलालकरवा, डॉ.संजय राख, डॉ.अधिनाथ पाटील, डॉ. गिरीष पाकनिकर, डॉ. बलीराम बागल, डॉ. अभय जाधव,डॉ. हितेश रायठट्टा,पुरूषोत्तम जयपूरीया,श्रीकांत बिरज करवा,जव्हार करवा,विनोद करवा,आशुतोष करवा,पियुश सोनवने आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना रेमेडिसेंविर इंजेक्शनचा पुरवठा हाफकीनमार्फत करण्यात येतो. रेमेडिसेंविर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या सात कंपनीमार्फत टेंडर प्रक्रिया राबवून रेमेडिसेंविर इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया पार पाडण्यात येत असून सर्व खासगी दवाखाने ज्या ठिकाणी कोविड बधितांवर उपचार करण्यात येतात अशा रुग्णालयांना रेमेडिसेंविर इंजेक्शनचा पुरवठा समान पद्धती व मागणीनुसार व्हावा तसेच या रेमेडिसेंविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत एका स्टॅकिस्टला अधिकृत करून जिल्ह्यातील खाजगी दवाखान्याच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी ,अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रणखाली रेमेडिसेंविर इंजेक्शनची एमआरपीनुसार खरेदी करून खाजगी रुग्णालयांना वितरित करण्याची पद्धती अवलंबिण्यात आली आहे. त्यानुसार मायलन कंपनीमार्फत जालना जिल्ह्यासाठी दहा हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रेमेडिसेंविर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही अशा पद्धतीने वितरण व्यवस्था उभारण्यात आली असल्याचे सांगत यापुढे इंजेक्शनचा तुडवडा जाणवणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी टास्कफोर्सने काही सूचना नुकत्याच निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार कोरोनाबाधित रुग्णांची ए ते ई अशी विगतवारी केली आहे. ए ते डी विगतवारीत समावेश असलेल्या रुग्णांना रेमेडीसेविर इंजेक्शन न वापरण्याच्या सूचना टास्कफोर्सने दिल्या आहेत. जे कोविडबाधित गंभीर स्वरूपाचे आहेत व ज्यांचा समावेश ई संवर्गात केला आहे केवळ अशाच रुग्णांना रेमेडीसेविर वापरण्याचा सल्ला टास्कफोर्सने दिला आहे. प्रत्येक डॉक्टरने कोरोना बधितांवर उपचार करताना टास्कफोर्सने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

मराठवाड्यात घनसावंगी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवणार

लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याचे शुद्धीकरण करत 25 ते 100 खाटांच्या रुग्णालयासाठी वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. मराठवाड्यात घनसावंगी तालुक्यात हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे सांगत हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यात ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान म्हणजे मोठी उपलब्धी ठरणार आहे.हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी अत्यंत सोयीस्कर व कमी खर्चिक असल्याबरोबरच हव्या त्या ठिकाणी घेऊन जात उपयोगात आणता येणारे तंत्रज्ञान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ब्रेक द चेन अंतर्गत 1 मे पर्यंत राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. या काळात कुठल्याही नागरिकांने विनाकारण घराबाहेर न जाता घरातच राहून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.