विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही,परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. १२ :- कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख यांनी आज स्पष्ट केले.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विविध वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सिनेट सदस्य आदींशी संवाद साधला त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण यांचेसह मान्यवर आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

यावेळी वैष्णवी किराड, आशिष मोहोर आदी विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्थितीतील अडचणींची माहिती दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. अजून हे निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता लक्षात घेता, यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास अडचणी उद्भवणार असतील तर त्या अडचणींचा सकारात्मकपणे विचार करू, यापूर्वीच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती भूमिका घेणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन होईल, मात्र दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मागणीसंदर्भात अडचणी पाहून राज्यपाल, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय  आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भातील पुढील 72 तासात निर्णय घेणार असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतानाच कोविड काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून चांगले सहकार्य मिळत असल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.