महात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव – प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे

महात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव – प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे

नवी दिल्ली, दि. ११: महात्मा जोतिराव फुले यांनी धर्मव्यवस्था व राजसत्तेला आव्हान दिले. सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी नष्ट करणारे व देशातील शुद्रातीशुद्रांना शिक्षण देण्याचे क्रांतिकारक कार्य करणारे महात्मा फुले हे जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव ठरतात, असे मत प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आज मांडले.

महात्मा फुले: एक क्रांतिकारक महामानव या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे२४वे पुष्प गुंफताना डॉ.कोकाटे बोलत होते.

महात्मा फुले हे मध्ययुगीन काळाला व आधुनिक काळाला बांधून ठेवणारे क्रांतिकारक व्यक्तीमत्व आहे. आधुनिक महाराष्ट्राला महात्मा फुलें यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा परिचय झाला. राज्यात व देशात सार्वजनिक व मोफत शिक्षणाचा पाया फुले यांनी घातला. पिढ्यान-पिढ्या पिचलेल्या वर्गाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी व्यवस्थे विरूध्द लढा दिला. जनमाणसाची, शुद्रातीशुद्रांची, कष्टकऱ्यांची मराठी भाषा साहित्यामध्ये आणण्याचे महत्त्वाचे कार्य फुले यांनी केले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य‍िक‍, सांस्कृतिक क्षेत्रात महात्मा फुले यांनी अमुलाग्र क्रांती घडवून आणत जनसामान्यांना जगण्याचे बळ दिले व त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, असे डॉ. कोकाटे म्हणाले.

महात्मा फुले शिक्षण घेत असतानाच त्यांनी अनुभवले की, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, क्रांती नाही व परिवर्तनही नाही म्हणूनच सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने धर्म बुडतो असा समज असणाऱ्‍या तत्कालीन समाजव्यवस्थेने महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचे चित्र पाहून त्यांनी या विरूध्द बंड पुकारत १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरु केली. पुढे १८५२ मध्ये मुलांची शाळा सुरु केली. या शाळांमध्ये सर्व जाती धर्माच्या स्त्री -पुरुषांना प्रवेश दिला. स्त्री-पुरुष समानता हे महात्मा फुले यांच्या कार्याचे वैशिष्ट्ये आहे. १८८२ साली त्यांनी ‘हंटर कमिशन’ पुढे साक्ष देत समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्त्रियांना शिक्षण देण्याचे महत्त्व पटवून दिले होते.

शिक्षणाच्या अभावामुळे या देशातल्या शुद्रातीशुद्रांची काय अवस्था झाली याचे विवेचन महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा असुड’ या आपल्या  ग्रंथाच्या उपोद्घाटामध्ये करताना म्हटले आहे, विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नितीविना गती गेली, गती विना वित्त गेले,वित्ता विना शुद्र खचलेइतके सगळे अनर्थ एका अविज्ञेने केले”

महात्मा फुले हे बांधकाम व्यावसायिक होते. पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रजच्या बोगद्याचे बांधकाम, खडकवासला धरणाचे बरेचसे बांधकाम व पुण्यातील अनेक पुल त्यांच्या कंपनीने बांधले. बांधकाम व्यवसायातून आलेला पैसा त्यांनी जनकल्याणासाठी वापरला. येणाऱ्‍या उत्पन्नातून त्यांनी शाळा काढल्या गोरगरिबांना शिकवले. महात्मा फुलेंना संकुचित राष्ट्रवाद मान्य नव्हता ‘एकमयी समाज’ हा त्यांचा राष्ट्रवाद होता असे डॉ. कोकाटे यांनी सांगितले.

स्त्रीभृणहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून महात्मा फुले यांनी अबला, निराधार स्त्रियांना आधार दिला. या महिलांमधील एक काशीबाई नातू यांचा मुलगा यशवंत यास दत्तक घेवून आपल्या विचाराचा व संपत्तीचा वारसदार केले म्हणून महात्मा फुले हे क्रांतिकारक ठरतात असे डॉ. कोकाटे म्हणाले.

अकाली वैधव्य आलेल्या महिलांना तत्कालिन समाजरितीनुसार केशवपणाला सामोरे जावे लागत असे केशवपणाची ही अमानुष प्रथा महात्मा फुले यांनी बंद पाडली, त्यासाठी नाभीकाची संघटना उभारली.

महात्मा फुलेंचे साहित्य जनसामान्यांना आत्मविश्वास मिळवून देणारे

महात्मा फुलें यांचे साहित्य हे क्रांतिकारक आहे. त्यांच्या साहित्याने दबलेल्या-पिचलेल्या वर्गाला प्रेरणा दिली  त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ‘शिवरायांचा पोवाळा’ ‘तृतियरत्न नाटक’ या महात्मा फुलेंच्या साहित्याने आमूलाग्र क्रांती घडवून आणल्याचे डॉ.कोकाटे म्हणाले.

महात्मा फुलेंनी शिवजन्मोत्सवाचा पाया घातला

आधुनिक महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून देण्याचे जास्तीत-जास्त श्रेय महात्मा फुलेंना जाते.  १८६९  मध्ये महात्मा फुले रायगडावर गेले शिवरायांच्या समाधीचा त्यांनी शोध लावला व तिथे चार दिवस मुक्काम केला. रायगडाहून परत येऊन पुण्यामध्ये त्यांनी १८६९ मध्ये शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करून देशात शिवजन्मोत्सवाचा पाया घातला असे डॉ.कोकाटे यांनी सांगितले.

३० सप्टेंबर १८७३ ला ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना करून फुले यांनी विवेकी पिढी निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रेरणेने कामगारांचे संघटन उभे राहिले नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंचे अनुयायी देशातील कामागार संघटनेचे पहिले अध्यक्ष होत, असे डॉ.कोकाटे म्हणाले.

पुणे, सातारा, जुन्नर आदी भागात पडलेल्या दुष्काळाच्या काळात महात्मा फुले यांनी स्वत:च्या वाड्यातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. दुष्काळी भागातील जनतेला अन्न-धान्य पोहचविले. महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचे अनुयायी, सहकारी व सर्व क्षेत्रातील लोकांनी १८८८ मध्ये मुंबई येथील सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना उत्सफुर्तपणे ‘महात्मा’ ही पदवी दिली.

महात्मा फुले यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आदी क्षेत्रात केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात मोठे कार्य उभे राहिल्याचे डॉ .कोकाटे यांनी सांगितले.