लसीकरणाला प्राधान्य द्या- आ.सतीश चव्हाण

औरंगाबाद ,१० एप्रिल /प्रतिनिधी 

कोरोनाची लाट थोपवण्यासाठी लस अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकार्‍यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना लसीचे महत्व पटवून देऊन पात्र असणार्‍या जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यास प्राधान्य द्यावे अशी सूचना आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

          कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.10) खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी, गदाना, वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी देऊन नॉन कोविड रूग्णांना मिळणार्‍या सोयी सुविधा, लसीकरण मोहीम, कोविड रूग्णांची परिस्थिती आदींचा आढावा घेतला. तसेच लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी जेष्ठ नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. तसेच बाजार सावंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आ.सतीश चव्हाण यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाल लक्षात घेता सर्वांनी शासनाचे नियम पाळून आपली व आपल्या कुटुंबांची योग्य ती काळजी घ्यावी, बाहेर पडतांना नियमित मास्कचा वापर करा, लसीकरणासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी पुढाकार घेऊन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी केले. याप्रसंगी मा.सरपंच वसंतराव नलावडे, सरपंच आप्पाराव नलावडे, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेश उबाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर दुधारे, सरपंच ज्ञानेश्वर मातकर, आदिनाथ साळुंके, प्रकाश नलावडे, पोपट काटकर, भगवानराव कामठे, जितेंद्र निकम, कांताराम आघाडे, केशव जाधव, युवराज नलावडे आदींची उपस्थिती होती.

          तसेच खुलताबाद येथील भक्त निवासातील कोविड केअर सेंटरला देखील आ.सतीश चव्हाण यांनी भेट देऊन कोरोना बाधित रूग्णांशी संवाद साधला. जेवण, औषधी वेळेवर मिळतात का? डॉक्टर योग्य काळजी घेतात का? काही अडचणी  आहेत का? अशी विचारणा आ.सतीश चव्हाण यांनी कोरोना बाधित रूग्णांना केली. तसेच सदरील रूग्णांची योग्य ती काळजी घेण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली. यावेळी तहसीलदार सुरेंद्र कुलकर्णी, नगरसेवक गजानन फुलारे, रावसाहेब फुलारे, मुजीब शेख, निसार पठाण, पोपट बारगळ, अजिनाथ काळे, डॉ.विजेता परदेशी, शहजाद शेख आदींची उपस्थिती होती.