नगर भूमापन अधिकारी सुरेखा सेठीया हिने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद/प्रतिनिधी

अरोपींशी संगणमत करुन जास्तीची जमीनी आरोपींच्या नावे पीआर कार्डवर लावल्या प्रकरणात भूमापन कार्यालयातील नगर भूमापन अधिकारी सुरेखा पुनमचंद सेठीया (43, रा. आयुर्वेदीक कॉलेज, बसस्टॅण्ड रोड, वजीराबाद, नांदेड) हिने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी फेटाळला.

प्रकरणात सय्यद रफत सय्यद गौस मोईनोद्दीन शुत्‍तारी (63, रा. किराडपुरा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार,  जनार्धन देवराव चव्हाण यांनी जिन्सी परिसरातील रमणस्तपुरा येथील 107.7 चौ.मी जमीनीपैकी 92.1 चौ.मी जमीन सय्यद रफत यांचे वडील सय्यद गौस यांना 24 जून 1976 रोजी विक्री करुन त्याचे खरेदीखत देखील तयार केले. त्यानंतर जनार्धन चव्हाण यांचा 12 ऑगस्ट 1977 तर सय्यद गौस यांचे 1 जानेवारी 1997 रोजी निधन झाले. जनार्धन चव्हाण यांची उरलेली जमीन त्याच्या वारसा हक्‍कांच्या नावे झाली. ती जमीन त्यांनी आरोपी मोहम्मद शोहेब अब्दुल मुनाफ व मोहम्मद युसूफ अब्दुल मुनाफ (दोघे रा. राजाबाजार, रमणस्तपुरा) यांना विक्रीकरुन त्याचे खरेदी खत केले.

सन 2012 मध्ये सय्यद रफत हे नगर भूमापन कार्यालयात गेले असता रमणस्तपुरा येथील जमीनीचे पीआर कार्ड पाहिले असता आरोपी मोहम्मद शोहेब व मोहम्मद युसूफ यांच्यानावार संपूर्ण म्हणजे 107.7 चौ.मी जमीन असल्याचे दिसले. दोघा भावांनी व इतरांनी आरोपी परिरक्षण भूमापक अप्पासाहेब टोंपे आणि नगर भूमापन अधिकारी सुरेखा सेठीया यांच्या मदतीने सदरील जमीन पीआर कार्डवर लावुन घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच मोहम्मद शोहेब व युसूफ या दोघांनी सदरील जागेवर बांधकाम करुन तेथे कलरचे दुकान देखील थाटले आहे. याबाबत फिर्यादी त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करुन हाकलुन देण्यात आले. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीने सादर केलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्‍ता मधुकर आहेर यांनी आरोपीला जामीनीवर सोडल्यास ते फिर्यादीवर दबाव आणु शकतात.गुन्ह्याच्या अनुषंगाने नगर भूमापन कार्यालयातील कागदपत्र हस्तगत करुन सखोल तपास करणे असल्याने आरोपीच्या जामीनाला विरोध केला.