कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी -राज्यमंत्री अब्दुल सत्तार

·        सर्व लोकप्रतिनिधीसह स्थानिक यंत्रणा प्रमुखांनी गर्दी न होण्याची खबरदारी घ्यावी
·        मेडीकल दुकानदारांनी औषधांव्यतिरीक्त इतर वस्तूंची  विक्री करु  नये, अन्यथा दंडात्मक कारवाई
·        रक्तदानासाठी लोकांनी पुढे यावे

औरंगाबाद, दिनांक 5:- जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवत असून लोकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करत कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे  निर्देश महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीनी विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.

May be an image of one or more people, people standing, people sitting and indoor

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी प्रशासनामार्फत जिल्ह्यात  राबवण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यामध्ये  लोकप्रतिनिधी, विविध यंत्रणा आणि जनता या तिघांनी एकत्रितपणे समन्वयातून नियमांचे पालन करण्यावर  प्राधान्याने भर देण्याची गरज असल्याचे सूचित करुन सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक तलाठी, गटविकास अधिकारी, तहसिलदार  यासह सर्वांनी ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी अधिक सक्रीय व्हावे. गावांध्ये लग्न समारंभ, अंत्यविधी यासह इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घेऊन गर्दीवर नियंत्रण ठेवावे. त्याचप्रमाणे सर्व खासगी रुग्णालयानी त्यांच्या दर्शनी भागात रुग्णालयाचे दरपत्रक लावावे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक असून त्यावर प्रशासनाने कडक नियंत्रण ठेवण्याचे निर्देशित करुन श्री. सत्तार यांनी आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरणास विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढवाव्यात. चांगल्या ॲम्ब्युलन्स ग्रामीण भागात उपलब्ध करुन द्याव्यात, असे सूचीत केले.

तसेच कोवीडच्या नियमावलीचे पालन प्रत्येकाने योग्य पध्दतीने केले तर निश्चितच संसर्ग वाढ थांबवता येईल. सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवून लॉकडॉऊन लावण्याची वेळ येणार नाही, यासाठी जनजागृती करुन नियमांचे पालन करण्याचे जनतेला आवाहन करावे. त्यासाठी मंदिर, मस्जिद, बौध्दविहार यासारख्या धार्मिक प्रार्थना स्थळांच्या माध्यमातून माईकद्वारा नियमावली, सूचना सांगाव्यात. गावांमध्ये दवंडी देऊन त्याद्वारा जनजागृती करावी तसेच लसीकरण मोहीमेमध्येही लोक सहभाग वाढवण्यासाठी सर्व यंत्रणासह लोकप्रतिनिधींनी पुढे यावे, तसेच जिल्ह्यात सर्वत्र पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधा खाटा, ऑक्सीजन उपलब्धता ठेवावी, असे सूचित करुन राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी सर्व मेडीकल दुकानदारांनी औषधांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही वस्तूची विक्री करू नये. इतर वस्तूंची  विक्री  करणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश श्री. सत्तार यांना यावेळी  दिले. तसेच जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने  रक्तदानासाठी  मोठ्या प्रमाणात लोकांनी  पुढे येणे आवश्यक असून सर्व  लोकप्रतिनिधीनीही त्यासाठी यंत्रणांना सहकार्य करत जनजागृती करावी, असे श्री. सत्तार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी प्रशासनामार्फत कोरोना उपचार सुविधात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत असून 182 उपचार सुविधा सध्या उपलब्ध असून 20 हजार खाटांची व्यवस्था तयार आहे. त्याचप्रमाणे संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे अधिक प्रभावीरित्या जनतेने  पालन करणे गरजेचे  असून  ते व्यापक प्रमाणात होण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन, आरटीओ  एक्साईज विभाग, पोलिस विभाग यांच्या पथकांव्दारा नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगून श्री. चव्हाण यांनी कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून 104 केंद्रावर चाचण्यांची सुविधा आहे. तसेच लसीकरण केंद्रातही वाढ करण्यात आली असून 99 केंद्रावर लसीकरण केल्या जात असल्याचे सांगून पर्याप्त प्रमाणात जिल्ह्यात ऑक्सीजनसाठा, रेमडीसीवीर, उपलब्ध असून कोरोना लससाठाही मुबलक असल्याचे सांगितले.  तसेच प्रशासनामार्फत  जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जात असून त्याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

आ. बागडे यांनी पूरेशा प्रमाणात आयसीयु खाटा उपलब्ध ठेवाव्यात. तसेच ग्रामीण भागात खासगी  रुग्णालयांना कोरोना उपचाराची परवानगी द्यावी, असे सूचित केले. आ. जैस्वाल यांनी मेडीकल दुकानांवर फक्त औषधविक्री होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियंत्रण ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करुन नियंत्रण ठेवावे, असे सूचीत केले.

डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागात उपचार सुविधामध्ये वाढ करण्यात येत असून कोरोना चाचण्या व लसीकरणाचे प्रमाणही वाढवण्यात येत असल्याचे सांगितले.