भारतीय लष्कराच्या मालकीचे गाईंचे गोठे बंद

नवी दिल्ली ,३१ मार्च :

ब्रिटीशांच्या काळात विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैन्याच्या जवानांना ताजे आणि शुध्द दूध मिळावे, यासाठी लष्कराने देशभर स्वतःच्या मालकीचे गाई-गुरांचे गोठे स्थापन केले होते. अलाहाबाद येथे 01 फेब्रुवारी 1889 रोजी पहिला गोठा सुरु करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर लष्कराने देशभरात 130 गोठे स्थापन केले होते, ज्यात 30,000 जनावरे होती. 1990 साली लेह आणि लद्दाख येथेही असे गोठे तयार करण्यात आले होते, जेणेकरून जवानांना त्यांच्या लष्करी तळांवर दररोज स्वच्छ आणि ताजे दूध मिळू शकेल.  या गोठ्यांच्या व्यवस्थापनासह, लष्करातील कर्मचाऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोठमोठ्या पट्ट्यांची देखभाल करुन तिथल्या गवताच्या पेंढ्याचीही व्यवस्था बघण्याचे आणि या पेंढ्या गोठे सांभाळणाऱ्या विभागांकडे पाठवण्याचेही काम होते.

जवळपास एक शतकभर, लष्कराच्या या गोठ्यांतून दरवर्षी 3.5 कोटी लिटर दूध आणि 25000 मेट्रिक टन पेंढ्याचा पुरवठा सातत्याने सुरु होता. तसेच या गोठ्यांमध्येच भारतात पहिल्यांदा जनावरांचे कृत्रिम रेतन करण्याचा यशस्वी प्रयोग झाला. 1971 च्या युद्धात,कारगिल युद्धाच्या वेळी पूर्व आणि पश्चिम सीमेवर लढणाऱ्या जवानांना याच गोठ्यांमधून ताज्या दुधाचा पुरवठा केला गेला. कृषी मंत्रालयाशी समन्वय साधत, या विभागाने, ‘प्रोजेक्ट फ्रेजवाल’ हा दुभत्या जनावरांचा जगातील सर्वात मोठा मिश्र संकराचा कार्यक्रम देखील राबवला होता. तसेच डीआरडीओच्या जैव-इंधन बनवण्याच्या प्रकल्पात देखील या विभागाने मदत केली होती.

तब्बल 132 वर्षे देशाची अखंडित अविरत सेवा केल्यानंतर आता या विभागाची सेवा समाप्त होत आहे. या विभागात काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याना लष्कराच्या इतर विभागांमध्ये समायोजित करण्यात आले आहे.