टीकेनंतर सोनू सूद मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Image

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून आजच सोनू सूदवर टीका करण्यात आली होती. यानंतर लगेचच सोनू सूद मातोश्रीवर गेला. सोनू सूद याच्याबरोबर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील होते.

सोनू सूद यांनी विस्थापित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी खूप मदत केली होती. त्याच मदतीवरून संजय राऊत आणि काही शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भाजप हा सोनू सूदचा बोलविता धनी आहे असं राऊतांनी म्हटलं होतं.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परराज्यातील गोरगरिब मजुरांना गावी जाण्याची भ्रांत असताना सोनू सूद त्यांच्यासाठी धावून आला. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडमधील या अभिनेत्याची सगळीकडचं चर्चा झाली. त्याच्या कामाची दखल खुद्द राज्यपालांनीही घेतली. आज बहुतेक मजूर मुंबई बाहेर पडला आहे. पण आता सोनूनं केलेल्या मदतीवरून राजकारण पेटलं आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याआधी सोनू सूद याने मराठीमध्ये ट्विट केलं. ‘स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं,’ असं सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सोनू सूदने आर्थिक मदत केली. यावरून संजय राऊत यांनी सोनू सूदवर निशाणा साधला. सोनू सूदला दत्तक घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचं राजकारण सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी सामनामधून केली. यानंतर सोनू सूदच्या बचावासाठी भाजपने पुढाकार घेतला.

लॉकडाऊच्या काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या शिताफीने आणि झपाट्याने कोणाला महात्मा बनवलं जाऊ शकतं? सूद याने म्हणे लाखो मजुरांना परराज्यात त्यांच्या घरी पोहचवलं. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीचं केले नाही का? असा मार्मिक सवाल सामनातून करण्यात आला आहे. सोनू सूदच्या निमित्तानं आता राजकीय कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *