अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

coronavirus: more than 18 lakh people are corona positive in ...
आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई, दि. ७: कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.

गृह विलगीकरणासाठी काय करावे लागेल..

  • त्यासाठी सदर रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाला अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणे आवश्यक आहे.
  • ज्या रुग्णाला घरी विलगीकरण (आयसोलेशन) करायचे आहे त्याच्यासाठी तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गृह अलगीकरणाची (होम क्वारंटाईन) सोय असणे आवश्यक आहे.
  • या रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी.
  • काळजी घेणारी व्यक्ती आणि त्या कुटुंबातील सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी.
  • मोबाईलवर आरोग्य सेतू कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
  • सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास रुग्णाबाबत माहिती देणे अनिवार्य आहे.
  • गृह विलगीकरणाविषयी प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर त्या व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.

वैद्यकीय मदत कधी घ्यावी..

काळजी घेणाऱ्या व्यक्तीने रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष द्यावे.

रुग्णाला धाप लागली, श्वासोच्छावासास अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये सतत दुखत असेल, शुद्ध हरपत असेल, ओठ, चेहरा निळसर पडला असेल असे लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

गृह विलगीकरण कधीपर्यंत..

गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसानंतर. मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर त्या व्यक्तीला गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्याचा हा गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *