खंडणीवसुलीत किती वाटा मिळाला?-फडणवीसांचा काँग्रेसला सवाल

मुंबई, 
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला 100 कोटींच्या खंडणीचा आरोप तसेच बदल्यांच्या रॅकेटबद्दल रश्मी शुक्ला यांच्या अहवालाच्या विषयावर, काँग्रेसने त्यांना यातला किती वाटा मिळाला, हे जाहीर करावे, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी दिले.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील ढासळलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अहवाल मागविण्याची मागणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी फडणवीस बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी या शिष्टमंडळात सहभागी होते. या दोन्ही प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन पत्रपरिषदा घेतल्या, पण त्या केवळ अनिल देशमुख यांना पाठीशी घालण्यासाठी. काँग्रेसची काही भूमिकाच नाही. त्यांचे दिल्लीतले नेते एक बोलतात, इथले एक. राज्यातील या वसुली सरकारने सारी नीतीमत्ता पायदळी तुडवली आहे. सत्तेसाठी सारे काही, अशी भूमिका घेणार्‍या काँग्रेसने आतातरी जाहीर करावे की सत्तेतल्या वाट्याच्या प्रमाणात त्यांना या खंडणीतला किती हिस्सा मिळाला, असा सवाल फडणवीस यांनी केला.
 
मग, खंडणी मागणारा शिवसेनेचा एजंट!
रश्मी शुक्ला यांना भाजपाच्या एजंट म्हणणार्‍या नवाब मलिक यांचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, बदल्यांचे रॅकेट उघड करणारे अधिकारी भाजपाचे एजंट आहेत तर मग खंडणी वसूल करणारे शिवसेनेचे एजंट आहेत का?
 
शंभरावर प्रकरणे राज्यपालांकडे
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातली अस्थिर परिस्थिती, प्रशासनाला चुकीचे निर्देश, केंद्राचे कायदे मानण्यास नकार, पराकोटीचा भ्रष्टाचार, कोरोनाला रोखण्यात अपयश, अशी शंभरावर प्रकरणाची जंत्री आम्ही राज्यपालांकडे दिली आहे.

सरकारमध्ये आणखी किती वाजे दडले आहेत ?भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

राज्य सरकारमध्ये सचिन वाजे यांच्यासारखे किती अधिकारी दडले आहेत असा सवाल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी उपस्थित केला.परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार करून घेण्याचे दिलेले निर्देश अत्यंत महत्वाचे असून देशमुख यांच्या उलट तपासणीतून अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो , असेही श्री . भांडारी यांनी नमूद केले.

      भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.भांडारी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. श्री. भांडारी म्हणाले की , महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती सचिन वाजे प्रकरणातून स्पष्ट झाली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळया कारणांखाली निलंबनाची कारवाई झाली आहे , अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या आणि त्यांच्याकडून वाजेंकरवी जी कामे करून घेतली जात होती , ती कामे करून घ्या , अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याचे दिसते. वाजेंसारखे किती अधिकारी सरकारमध्ये दडले आहेत हे कळले पाहिजे.

     मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणामुळे ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करा , असे निर्देश दिले आहेत . मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत , असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. त्याचबरोबर देशमुख यांनाही या याचिकेत पक्षकार करून घ्या असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे . तसे झाल्यास देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल, असेही श्री . भांडारी यांनी नमूद केले.