कन्टेनमेंट झोनमध्ये नियमांचे पालन अधिक कडक करावे -सुधाकर शिंदे

चाचण्यांचे प्रमाण वाढवावे.
सर्व यंत्रणांनी समन्वयाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे

औरंगाबाद,दि.24 – जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात रूग्ण आढळत आहे तो भाग कन्टेनमेंट झोन बनवून त्या ठिकाणी नियमांचे अधिक कडकपणे पालन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी सुधाकर शिंदे यांनी आज येथे दिले.

Displaying _DSC1548.JPG

          जिल्हाधिकारी कार्यालयात कोराना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत सुधाकर शिंदे यांनी यंत्रणांना निर्देशित केले, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी, संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

          यावेळी श्री. शिंदे यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन वाढती रूग्णसंख्या वेळीच रोखण्यासाठी तातडीने आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचे निर्देशित करून बाधिताच्या संपर्कातील व्यक्ती, अति जोखीम तसेच कमी जोखमीच्या व्यक्ती या सर्वांच्या चाचण्यांमध्ये वाढ करावी. प्रती बाधित व्यक्तीमागे 10 जणांच्या चाचण्या कराव्यात. रूग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात. त्यासाठीच्या आवश्यक मनुष्यबळाची कंत्राटी पद्धतीने भरती करावी. तसेच सर्व रूग्णालयांनी गंभीर रूग्णांसाठी खाटा रिक्त ठेवणे नियमानुसार आवश्यक असून ज्या ठिकाणी गरज नसलेल्या रूग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केल्याचे आढळुन येईल अशा रूग्णालयांवर कारवाई करण्याबाबत श्री. शिंदे यांनी सूचित केले.

          तसेच जिल्ह्यात अधिक रूग्णसंख्या असलेल्या भागांमध्ये कन्टेनमेंट झोनच्या नियमावलींचे अधिक कटाक्षाने पालन करत व्यापक प्रमाणात प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. मृत्यू झालेल्या रूग्णांच्या प्रवेशापासून त्या रूग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांबाबतच्या सर्व माहितीचे विश्लेषण करून अहवाल सादर करावा. त्याचसोबत रूग्णांबाबतची, उपचार सुविधा, प्रतिबंधात्मक उपायायोजना या बाबतची माहिती नियमितपणे अद्ययावत करून संकेतस्थळावर अपलोड करावी. जिल्ह्यातील उपचार सुविध बळकटीकरणासाठी आवश्यक निधी शासनाकडून गरजेनुसार उपलब्ध करून दिला जाईल. सर्व यंत्रणा समन्वयपुर्वक संसर्ग रोखण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्नशिल असल्याचे सांगून याच पद्धतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सूचित केले.

Displaying _DSC1537.JPG

          जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत असून घाटी येथील प्रयोगशाळेची अडीच हजार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची दरदिवशी पंधराशे स्वॅब नमुने तपासणीची क्षमता असल्याचे सांगून यंत्रणांमार्फत संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील उपलब्ध उपचार सुविधा, ऑक्सीजनसाठा, औषधांची उपलब्धता, लसीकरण,  अंशत: लॉकडाऊन यासह सर्व प्रतिबंधात्मक उपायांची सविस्तर माहिती यावेळी दिली.

          मनपा आयुक्त श्री. पाण्डेय यांनी पहिल्या लाटेतील संसर्गात ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीने आताही चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून एकुण 104 चाचणी केंद्र यामध्ये शहरात 38 आणि ग्रामीणमध्ये 66 केंद्रांवर कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याचे सांगितले.

          डॉ. गोंदावले यांनी दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्ग वाढत असून त्याप्रमाणात तातडीने ग्रामीण भागातील सीसीसी तसेच डीसीएचसी सज्ज ठेवण्यात येत असल्याचे सांगून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.