महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी,भाजपा सदस्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही,शरद पवारांनी पुन्हा केली पाठराखण
परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली,२२ मार्च :

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांचे संतप्त पडसाद आज लोकसभेत उमटले. या मुद्यावरून भाजपा सदस्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. 

भाजपाचे गिरीश बापट, नवनीत राणा, पूनम महाजन, कपिल पाटील आदी सदस्यांनी शून्य तासात अतिशय आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी या सर्व सदस्यांनी केली. सरकारवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप झाला. या सरकारने आतापर्यंत किती वसुली केली असेल, या शब्दात सरकारवर हल्ला चढवताना पूनम महाजन म्हणाल्या की, कोण कोणासाठी काम करीत आहे, हेच समजत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करीत असताना शिवसेनेला मिर्च्या का झोंबतात, असे महाजन म्हणाल्या. पूर्वी गुन्हेगार खंडणी वसूल करीत होते. आता सरकारच खंडणी वसुली करीत असल्याचा आरोप गिरीश बापट यांनी केला. भाजपाचे मनोज कोटक यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
 
घटनाक्रमासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार : नवनीत राणा

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या मुद्यावरून अतिशय आक्रमक होत्या. महाराष्ट्रातील घटनाक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. 16 वर्षांपासून निलंबित असलेल्या सचिन वाझे यांची वकिली का करीत आहे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे, असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतानाही ठाकरे यांनी वाझे यांना पोलिस सेवेत परत घेण्याची मागणी केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शरद पवारांनी पुन्हा केली पाठराखण
 
नवी दिल्ली, 
सकृतदर्शनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेले आरोप गंभीर वाटत होते, पण या प्रकरणात जे पुरावे समोर आले, ते पाहता आरोपात काहीच तथ्य नसल्याचे दिसते. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी स्पष्ट केले. 

6 जनपथ या आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रपरिषदेत पवार यांनी देशमुख यांना एकप्रकारे अभयच दिले. कोरोनामुळे अनिल देशमुख 5 ते 15 फेब्रुवारी या काळात रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे ते निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना कसे भेटू शकतील, अशी विचारणा करीत, पवार यांनी देशमुख रुग्णालयात दाखल असल्याची कागदपत्र दाखवली. फेब्रुवारीच्या मध्यात देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचा आरोप परमबीरसिंह यांनी केला होता. यावर देशमुख 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर 16 ते 27 फेब्रुवारीपयर्र्त ते गृहविलगीकरणात होते. या दरम्यान त्यांनी सचिन वाझे यांची भेट घेतल्याचे परमबीरसिंह यांचे आरोप खोटे असल्याचे दिसून येते. त्यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही. परमबीरसिंग यांचे आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे, असे पवार म्हणाले. परमबीरसिंह यांच्या आरोपांचा महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ एका प्रश्नावर पवार निरुत्तर
15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी पत्रपरिषद घेतली होती, याकडे लक्ष वेधले असता पवार निरुत्तर झाले. मी जे काही बोललो ते या कागदपत्राच्या आधारे. देशमुख यांनी पत्रपरिषद घेतली नाही, तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलले, असे त्यांनी सांगितले.
आरोप अतिशय चिल्लर
मूळ प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी देशमुखांवरील आरोपांचे प्रकरण पुढे करण्यात आले. अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके कुठून आली, मनसुख हिरेन यांची हत्या कोणी आणि का केली, हे यातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. देशमुखांवरील खंडणी वसुलीचे आरोप त्या तुलनेत चिल्लर आहे. चौकशीची दिशा बदलण्यासाठी परमबीरसिंह यांनी असे आरोप केले आहेत, असा दावा त्यांनी केला.
रुग्णालयाच्या दारावरच पत्रकारांशी बोललो : देशमुख
15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत मी गृहविलगीकरणात होतो. 28 फेब्रुवारीलाच घराबाहेर पडलो. 15 फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर घरी जात असताना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मला पत्रकारांनी गाठले. मला खूप अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे मी तिथेच खूर्ची मागवून बसलो आणि पत्रकारांच्या काही प्रश्नांची उत्तर दिली. नंतर गाडीत बसून मी घरी निघून गेलो, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात,याचिकेत अजून एक गंभीर आरोप 
Maharashtra CMO says Param Bir Singh letter 'unsigned' | Deccan Herald

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ माजली असताना आता त्यांनी न्याय्य चौकशीच्या मागणीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, आपल्या बदलीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये अजून एक गंभीर दावा त्यांनी केला आहे. “दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात काही भाजपा नेत्यांना अडकवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता”, असा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेमध्ये केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजपाकडून अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

काय आहे परमबीर सिंग यांच्या याचिकेत?

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून होम गार्डमध्ये करण्यात आलेली बदली अन्याय्य असून महाराष्ट्र सरकारने जारी केलेले बदलीचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधण्यासाठी मोहन डेलकर प्रकरणाचा देखील उल्लेख केला आहे. “प्राथमिक चौकशीनंतर या प्रकरणात सखोल तपास सुरू करण्यात आला. मात्र, या प्रकरणात भाजपाच्या काही नेत्यांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून वारंवार दबाव टाकला जात होता. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र, याचिकाकर्ते (परमबीर सिंग) या दबावाला बळी पडले नाहीत”, असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.