‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Makrand Deshpande's next artistic movie 'Bardo'

दिल्ली, दि.22 : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘ताजमाल’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.

‘बार्डो’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला  आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे आहेत. हा चित्रपटाचे निर्माते रितु फिल्मस् कट एलएलपी आहेत. याच चित्रपटातील ‘रान पेटला…’ या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचाही पुरस्कार जाहीर झाला आहे.  प्रोडक्शन डिझाइन  सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.

राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला जाहीर झाला आहे.  हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर टूलाईन स्टुडिओ प्रा.लि. यांची निर्मिती आहे.

‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.  उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘कस्तुरी’ या हिंदी सिनेमाला जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आहेत तर इनसाईट फिल्मसची निर्मिती आहे.

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार

‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रिएशनने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहेत. तर राज प्रितम मोरे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे.

सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत  ‘होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.

स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार जाहीर

स्पेशल मेन्शन या श्रेणीत ‘लता भगवान करे’ या मराठी सिनेमाच्या अभिनेत्री लता करे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याच श्रेणीत ‘पिकासो’ या सिनेमाला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.

सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रटाचा पुरस्कार ‘अनु रूवड’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते  ओबो नोरी पिक्चर आहेत तर दिग्दर्शक दिलीप कुमार डोले हे आहेत.

‘त्रिज्या’ या सिनेमाला  उत्कृष्ट ऑडिओग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

चित्रपटांवरील उत्कृष्ट समीक्षात्मक पुस्तक या श्रेणीत  ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला   स्पेशल मेन्शन पुरस्कार प्राप्त झाला आहे.


खिसा’च्या खिशात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरणाऱ्या  ‘खिसा’ या लघुपटाने  ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार पटकावला आहे.  या लघुपटाचे दिग्दर्शन राज मोरे यांनी केले असून लेखन कैलास वाघमारे यांनी केले आहे. हा लघुपट खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर भाष्य करणारा असून एका लहान मुलाची मन हेलावून टाकणारी ही कथा आहे. या लघुपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ‘खिसा’चे दिग्दर्शक राज मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ”आपल्या सर्वांनाच माहित आहे, की वर्षभरात ‘खिसा’ जगभर गाजतोय. जगभरातील अनेक मोठमोठ्या फिल्मफेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रिमिअरचा बहुमान पटकावल्यानंतर भारतातही ‘खिसा’ने अनेक फिल्म फेस्टिवलवर आपली मोहोर उमटवली आणि आता तर राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्यामुळे  माझ्यासाठी ही खूपच आनंदाची, अभिमानाची  गोष्ट आहे. ‘खिसा’साठी नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार मला मिळाला आहे. मात्र हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो संपूर्ण टीमला मिळाला आहे. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते. त्यामुळे सगळ्या ज्युरींसह मी संपूर्ण टीमचेसुद्धा आभार मानतो. एवढा मानाचा पुरस्कार मिळाल्याने आता जबाबदारीही तितकीच वाढली आहे. त्यामुळे भविष्यातही अधिक आशयपूर्ण चित्रपट देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असू.” 
‘खिसा’ या मराठी लघुपटाची गोव्यात होणाऱ्या ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही निवड झाली होती. इस्तंबूल फिल्म अवॉर्ड्स २०२०मध्ये या लघुपटला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले होते.  कॅनडाच्या मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, २६व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डायोरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अर्जेंटिनाच्या डायोरोमा इंडी शॉर्ट्स अवॉर्ड्स, ब्युनोस आयर्स, येथील महोत्सवांतही ‘खिसा’ची निवड करण्यात आली आहे. तुर्कस्थानातील इस्तंबूल येथे मार्च २०२१मध्ये होणाऱ्या आयएफएच्या वार्षिक लाइव्ह स्क्रीनिंग मेळाव्यात प्रतिष्ठित अशा गोल्डन स्टार पुरस्कारासाठी हा लघुपट पात्र ठरला आहे. तर डब्लिन इंटरनॅशनल शॉर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल २०२०मध्ये ‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळाले आहे.