सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे ,योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा-शरद पवार,दिल्लीत पवारांची हायकमांड मीटिंग

गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही-जयंत पाटील

मुंबई /दिल्ली,२१ मार्च :सध्या राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरून राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या, असे देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते, असा आरोप सिंग यांनी केला आहे. या लेटर बॉम्बनंतर भाजपा देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला असून, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने दिल्लीत बैठक बोलावली.

जयंत पाटील म्हणाले, “सध्या एटीएस व एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहे. या चौकशीच्या माध्यमातून काही ना काही ठोस अशा गोष्टी बाहेर येतील, असा आम्हाला विश्वास आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस याचं ठाम मत आहे की, जे गुन्हे झालेले आहेत, अंबानींच्या घराबाहेर जे वाहन सोडण्यात आलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या याबाबतीत खोलात जाऊन ज्यांनी हे गुन्हे केलेले आहेत, त्यांना शोधून काढण्याचं काम ज्या यंत्रणा करत आहेत, त्यांचा तपास पूर्ण होणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे लवकरात लवकर तो तपास पूर्ण होईल.”

, “गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.  जो प्रमुख मुद्दा आहे, जी प्रमुख घटना झालेली आहे, त्यावरून लक्ष विचलीत करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अंबानींच्या घरासमोर जे वाहन ठेवलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या, याचा शोध यावरच आमचं लक्ष आहे. यानंतर यथायोग्य उर्वरीत गोष्टी होतील.” असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे ,योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा-शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य करत भूमिका मांडली. देवेद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं आहे. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, असं पवार म्हणाले.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राविषयी बोलताना शरद पवार म्हणाले,”परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही. पत्रकार परिषदेपूर्वीच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.