उद्धव सरकारने सत्तेचा नैतिक अधिकार गमावला-रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली, 
वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंना कुणाच्या दबावामुळे पोलिस खात्यात परत घेण्यात आले, गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटींची खंडणी वसुली कुणासाठी करीत होते, असा गंभीर आरोप भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी रविवारी केला. उद्धव ठाकरे सरकारने सत्तेचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा हल्लाबोलही प्रसाद यांनी केला.

पाटण्यात आयोजित पत्रपरिषदेत प्रसाद यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी आपल्या पत्रातून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरून शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि आघाडी सरकारलाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.  वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे अनेक वर्षे निलंबित होते. कोरोनाकाळात पोलिस अधिकार्‍यांची कमतरता असल्याचे कारण सांगत त्यांना परत सेवेत घेण्यात आले. त्यांना कुणाच्या दबावाने सेवेत घेण्यात आले, हा भाजपाचा पहिला प्रश्न आहे. वाझे यांना पोलिस सेवेत परत घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा की, शरद पवार यांचा, ते स्पष्ट झाले पाहिजे. या सार्‍या प्रकरणांवर शरद पवार यांचे मौन संशय निर्माण करणारे आहे, असे ते म्हणाले. सचिन वाझे यांना वाचविण्यामागे शिवसेनेची कोणती मजबुरी होती. वाझे यांच्या पोटात आणखी काय-काय दडले आहे, असे ते म्हणाले.
 
 
संपूर्ण महाराष्ट्रासाठी किती लक्ष्य होते?
परमबीरसिंह यांनी पत्रातून केलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. एकट्या मुंबईसाठी 100 कोटी रुपयांच्या खंडणीचे लक्ष्य होते, तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ते किती होते. त्याचप्रमाणे एका मंत्र्याचे खंडणीचे लक्ष्य 100 कोटी होते, तर अन्य मंत्र्यांचे किती, हे मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी सांगितले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. गृहमंत्री देशमुख जी 100 कोटी रुपयांची खंडणी वसुली करीत होते, ती स्वत:साठी करीत होते, राष्ट्रवादी काँग्रेससाठी की सरकारसाठी करीत होते, ते त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे प्रसाद म्हणाले.
 
 
हा भ्रष्टाचार नव्हे, लूट
हा भ्रष्टाचार नव्हे, तर शासकीय यंत्रणांचा वापर करून जनतेची केलेली लूट आहे. सरकारी भ्रष्टाचाराचा असा खुला आणि राजरोस प्रकार आधी कुठे पाहण्यात आला नाही. मी शरद पवार यांनाही माहिती देत होतो, असे परमबीरसिंह यांनी पत्रात म्हटले. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसताना परमबीर कोणत्या अधिकारात शरद पवार माहिती देत होते. अनिल देशमुख यांच्या खंडणी मागण्याच्या प्रकाराची परमबीरसिंह यांनी पवारांना माहिती दिल्यावरही त्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही, हा मोठा प्रश्न असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.