14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या आस्मि आडकर, कर्नाटकाच्या क्रिश त्यागी यांना विजेतेपद

मुंबई,  20 मार्च, 2021 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए 14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आस्मि आडकर हिने, तर मुलांच्या गटात कर्नाटकाच्या क्रिश त्यागी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.  

Displaying Winner and runner up with chief guest.jpg

 जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व वुडहाऊस जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आस्मि आडकर हिने ओरिसाच्या सोहिनी मोहंतीचा 1-6, 6-4, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दोन तास चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सोहिनीने सुरेख सुरुवात करत आस्मिला फारशी संधी न देता हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या आस्मिने जोरदार खेळ केला. सामन्यात 3-3 अशी बरोबरी असताना सातव्या गेममध्ये आस्मिने सोहिनीची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये आस्मिने आक्रमक व चपळाईने खेळ करत पाचव्या व सातव्या गेममध्ये सोहिनीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. 13वर्षीय आस्मि ही पुण्यात अभिनव विदयालय इंग्लिश मिडीयम शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून बाउन्स टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधी तिने फेब्रुवारीमध्ये अहमदाबाद येथे 16 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावले होते. तसेच हरियाणा येथे 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अस्मिने विजेतेपद मिळवले होते. 
मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागी याने तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएसचा 6-4, 7-6(5) असा पराभव करून विजेतेपद मिळवले. क्रिश हा सिल्व्हर ओक्स इंटरनॅशनल शाळेत नववी इयत्तेत शिकत असून सोल एन स्पोर्ट्स येथे प्रशिक्षक सूरज बिक्कनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.  
स्पर्धेतील विजेत्यांना इनरझल यांनी पुरस्कृत केलेला करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्पर्धा संचालक मनोज वैद्य, एआयटीए सुपरवायझर सोनल वैद्य आणि वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या कोविड मुळे जगभरात अडचणी असताना कोणत्याही दुर्घटनेशिवाय एमएसएलटीए यांच्या वतीने सलग दोन आठवड्यात यशस्वीपणे पार पडणारी हि दुसरी राष्ट्रीय टेनिस स्पर्धा आहे.   
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:क्रिश त्यागी(कर्नाटक)(2) वि.वि.प्रणव रेथीन आरएस(तामिळनाडू)(1)6-4, 7-6(5); 
मुली:
आस्मि आडकर(महाराष्ट्र)वि.वि.सोहिनी मोहंती(ओरिसा) 1-6, 6-4, 6-2;