नांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल – पालकमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई, दि. १८ : नांदेडमधील क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी बजावता यावी, यासाठी सराव करण्याची सुविधा मिळण्यासाठी कौठा येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी २५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भात पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच मुंबईत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, किशोर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

श्री.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडूंना सर्वच खेळांसाठी आधुनिक सुविधा असलेले क्रीडांगण मिळावे, यासाठी कौठा येथे क्रीडा संकुल उभारण्यात यावे. या संकुलात मैदानी तसेच इनडोअर खेळांसाठीच्या सुविधा निर्माण कराव्यात. हे क्रीडा संकुल स्वखर्चावर चालविले जावे, यासाठी नियोजन करावे. तसेच क्रीडांगणाच्या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

जिल्हाधिकारी श्री. इटनकर यांनी क्रीडा संकुलाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण केले. या संकुलात ॲथलेटिक ट्रॅकसह बॅडमिंटन, स्केटिंग, जलतरण अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

कसे असेल क्रीडा संकुल

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिन्थेटिक ॲथलेटिक ट्रॅक, प्रेक्षकांसाठी पॅव्हिलियन, बहुविध खेळांचे बहुउद्देशीय बंधिस्त क्रीडांगण असणार. यामध्ये बँडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, हँडबॉल, जुडो-कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिमनॅस्टिक व स्कॅश आदी खेळांचा सराव करता येणार.

त्याचबरोबर या क्रीडा संकुलात ऑलंपिकच्या दर्जाचा जलतरण तलावही असणार आहे. याशिवाय तारांकित दर्जाची राहण्याची सुविधा, मोठे स्क्रिन, मल्टिकझिन कॅफेटेरिया, दुकाने, लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक सुविधांचाही समावेश या क्रीडा संकुलात होणार आहे.

नारवट येथील वनपर्यटन केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा – पालकमंत्री अशोक चव्हाण

नारवट येथील वनपर्यटन केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड जिल्ह्यातील नारवट येथे उभारण्यात येणाऱ्या निसर्ग उद्यान/वनपर्यटन केंद्र व बांबू प्रशिक्षण केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्या.

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील नारवट येथे बांबू प्रशिक्षण केंद्र तसेच निसर्ग उद्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची आढावा बैठक पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.चव्हाण म्हणाले, नारवट येथील 700 एकर जागेपैकी 100 एकर जागेवर पर्यटकांसाठी सोयी सुविधा असलेले निसर्ग पर्यटन उद्यान तसेच बांबू प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. या पर्यटन केंद्रात चांगल्या सुविधा असाव्यात, पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या निसर्ग पर्यटन केंद्राला किती जण भेट देऊ शकतील, त्याची देखभाल दुरुस्तीसाठी उपाययोजना आदींबाबतही विचार करण्यात यावा. तसेच पर्यटन केंद्र व बांबू प्रशिक्षण केंद्र संपूर्ण सौरऊर्जा प्रकल्पावर चालविण्यात यावा. या उद्यानाच्या ठिकाणी सध्या काही सुविधा करण्यात आल्या आहेत. त्या तशाच ठेवून त्यामध्ये आणखी काही चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. नर्सरी, बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी सुविधा केंद्रे, सध्या असलेल्या तलावाची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे.

या प्रकल्पासाठी राष्ट्रीय बांबू प्रकल्प, कौशल्य विकास विभाग व इको टुरिझम बोर्ड आदी विभागांचाही सहभाग घेऊन आराखडा तयार करावा. तसेच बांबू प्रशिक्षण केंद्रातील वस्तुंची विक्री व प्रदर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, असेही श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

निसर्ग पर्यटन उद्यान व बांबू प्रशिक्षण प्रकल्प

प्रस्तावित केंद्रामध्ये बांबू अभ्यागतांसाठी सुविधा केंद्राबरोबरच प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठीही सामान्य सुविधा केंद्राच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच बांबूवरील प्रक्रिया प्रकल्प, डिझाईन सेंटर, बांबूपासून बनणाऱ्या हस्तकला साहित्यासाठी इमारत, नर्सरी, जैवविविधता उद्यान आदी सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर तलावाचे पुनरुज्जीवन, जॉगिंग ट्रॅक, प्रदर्शन कक्ष, कॅफेटेरिया, खुले सभागृह, विद्यार्थ्यांसाठी व ट्रेकर्ससाठी सुविधा आदींचाही समावेश पहिल्या टप्प्यात आहे.

सुविधा केंद्रात बांबूचा बांधकाम क्षेत्रातील उपयोगासंबंधीचा प्रमाणपत्र वर्ग, बांबूपासून फर्निचर तयार करणे, हस्तकला वर्ग आदी प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.