गृहकर्जाच्या नावाखाली एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीला 31 लाख रुपयांचा गंडा

औरंगाबाद, दिनांक 18 :बनावट मुल्याकंन अहवाल सादर करत, जागेचे क्षेत्र वाढवून दाखवत गृहकर्जाच्या नावाखाली एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीला 31 लाख 65 हजार  803 रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांना आरोपींपैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.
सर्फराज सिराज सिद्दीकी (रा. समतानगर ) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी त्याला गुरुवारी दि.18 पहाटे अटक केली. तर प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी त्याला रविवारपर्यंत दि.21 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
  प्रकरणात एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीचे अधिकारी गणेश जयराम चौधरी (32) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, नोव्हेबर 2018 मध्ये आरोपी सर्फराज सिद्दीकी याने अदालत रोड येथील एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता. कंपनीने त्रयस्थ संस्थेमार्फत सिराज याचा व्यवसाय व ते कजार्साठी पात्र आहेत का, याची तपासणी केली. त्यात कर्ज देण्यास अयोग्य असा शेरा संस्थेने अहवालात दिला होता. असे असतानाही फायनान्स कंपनीचे विक्री व्यवस्थापक तथा आरोपी विशाल रावसाहेब जाधव (रा. गुरुकुलसिद अपार्ट, बीड बायपास) याने कंपनीचे क्रेडीट मॅनेजर तथा आरोपी भुषण देविदास बावीस्कर (रा. साईनगर एन-6 सिडको) यास मेलद्वारे सिराज याचे घर व व्यवसायाची पाहणी केली असून त्यास कर्ज द्यावे, असे कळविले.
बावीस्कर यास कर्ज मंजूर करण्याचे कोणतेही अधिकार नसतानाही त्याने पदाचा गैरवापर केला व कर्ज मंजूर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कर्ज प्रकरणात सिराज सिद्दीकी, जाधव व बावीस्कर या तिघांनी संगनमत केले. अविनाश पाटील यांच्या नावे बनावट मुल्याकंन रिपोर्ट तयार केला. त्यावर बनावट स्वाक्षर्‍या केल्या असून रिपोर्टच्या शेवटच्या पानावर शिक्काही नाही. तसेच ज्या घरावर कर्ज घेण्यात आले त्या घराच्या खरेदी खतावर 120 चौरस फुट जागा असतानाही आरोपींनी संगनमत करुन जागा 300  चौरस फुट दाखवली. या बनावट कागदपत्राच्या आधारे 31 लाख रुपये व 65 हजार 803 रुपये कर्ज मंजूर करण्यात आले.
3 डिसेंबर 2018 ला सिराज यास कर्जाची रक्कम देण्यात आली. पण, पुढे त्याने नियमित कर्ज हप्ते भरले नाही. कर्जखाते थकीत झाल्याने कंपनीचे वसूली अधिकारी ज्या मालमत्तेवर कर्ज दिले होते तेथील पत्त्यावर गेले असता सर्फराज सिद्दीकी तेथे राहतच नसल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीच्या जोखीम नियंत्रण अधिकाजयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. कंपनीच्या अंतर्गत चौकशीत सर्फराज, जाधव व बावीस्कर या तिघांनी संगनमत करुन बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. प्रकणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी, आरोपीकडून फसवणूकीची रक्‍कम हस्तगत करणे आहे. बनावट मुल्यांकन रिपोर्ट कोणी व कोठे तयार केला तसेच त्यावर कोणाची स्वाक्षरी आहे याचा तपास करणे आहे. गुन्ह्यातील आरोपीच्या साथीदारांना अटक करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.