खत मंत्रालयांतर्गत नाेकरी भरतीत पारदर्शकता नाही, केंद्राला नाेटीस

औरंगाबाद, दिनांक 18 :केंद्र सरकारच्या रासायनिक आणि खते मंत्रालयाअंतर्गत नोकर भरतीत निवड आणि भरती प्रक्रिया कायदेशीर पणे करावी यासाठी परिक्षार्थीने याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीनंतर औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापुरवाला आणि न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी केंद्र सरकारसह प्रतिवाद‍्यांना नोटीस बजावली आहे.
याचिकाकर्ता राहुल चंद्रशेखर धनेधर यांनी अ‍ॅड. विष्णु ढोबळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेनूसार, केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असेलेली राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांनी विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यानूसार, 19 जुलै 2020 याचिककर्ता राहुल धनेधर याने अर्ज केला आणि 16 ऑगस्ट 2020 रोजी त्याने परिक्षा दिली. परिक्षा उर्तिण झाल्यानंतर राहुल धनेधर याची 26 नोव्हेंबर 2020 रोजी व्यक्‍तिगत मुलाखत घेण्यात आली. मात्र कंपनीने लेखी तसेच तोंडी मुलाखतीची गुणवत्‍ता यादी ऑनलाईन आणि नोटीस बोर्डवर प्रसिध्द केली नाही. याचिकाकर्त्याने विनंती करुनही गुणवत्ता आणि निवड प्रकियासंबंधी कागदपत्रे प्रसिध्द केली नाहित. निवड प्रक्रिया कायदेशीर आणि गुणवत्‍तेनुसार कायदेशीरपणे करावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेच्या सुनावणीनंतर खंडपीठाने केंद्र सरकारसह रासायनिक आणि खते विभागाचे सचिव, राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडचे जिल्हा चेअरमन मुंबई यांना नोटीस बजावली. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. विष्णु ढोबळे, तर भारत सरकार आणि इतर प्रतिवादींच्या वतीने अ‍ॅड. अजय जी. तल्हार यांनी काम पाहत आहेत.