समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्यात विलीनीकरण करण्यास तत्वत: मान्यता – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई, दि. 17 : दूध उत्पादन क्षमता, पुरवठा, रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था म.अंबड या संस्थांचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुश नगर, जिल्हा जालना या साखर कारखान्यात विलीनीकरण करण्यास तत्वत: मान्यता देत असल्याचे  सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था म.अंबड या संस्थेचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुश नगर, जिल्हा जालना या साखर कारखान्यात विलीनीकरण करण्यास मान्यता मिळण्याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रधान सचिव अनुपकुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी अधिकारी  बैठकीत उपस्थित होते.

जालना जिल्ह्याच्या आर्थिक, दरडोई उत्पन्न, मानव विकास निर्देशांक यात वाढ होण्याच्या दृष्टीने दूध संघाची निर्मिती करण्यात आली. परंतू भांडवल निर्माण करण्यास काही अडचणी निर्माण झाल्याने या संघाची दूध उत्पादकता क्षमता कमी आहे. दूध उत्पादक क्षमता अधिक वाढविण्यासाठी, रोजगार क्षमता, आर्थिक विकासाच्या दृष्टीने विलीनीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीत केली.

यानुसार शासन स्तरावर नियमानुसार तत्वत: मान्यता देण्याचे व दूध संघाच्या पोट नियमामध्ये  नियमानुसार आवश्यक बदल करण्याचे निर्देश यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.