पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करण्याचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि. १७ : येणारा उन्हाळा लक्षात घेता मांजरा आणि निम्न तेरणा धरणातील पाण्याचे आवर्तन सुरळीत राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, संबंधित महसूल तसेच पोलीस यंत्रणा आणि जलसंपदा विभागाने एकत्रितपणे  पाण्याच्या योग्य वितरणाची जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिले.

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प कालवा समन्वय समितीची बैठक झाली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार सर्वश्री धिरज देशमुख, सुरेश धस, अभिमन्यू पवार, विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, नमिता मुंदडा, समन्वय समितीचे सदस्य बजरंग सोनवणे, ललित भाई शहा यांच्यासह लातूर महापालिका आयुक्त अमन मित्तल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता आणि प्रशासक अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अभिजित नितनवरे, उपविभागीय अभियंता एस जी कोगे तसेच महसूल आणि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, येत्या उन्हाळ्यात मांजरा आणि निम्न तेरणा धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते हे लक्षात घेता पाणी वितरणाचे सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे. मांजरा आणि निम्न तेरणा धरणामध्ये साठलेल्या गाळामुळे धरणाची साठवणक्षमता कमी झाली आहे. हे लक्षात घेता या दोन्ही धरणांमधील गाळाचे सॅटेलाईट इमेजेसच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात यावे.

ज्या शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेण्यात यावेत आणि मागणीनुसारच पाणी सोडण्यात यावे. कालव्यातून अनधिकृतपणे घेण्यात येणारे पाणी थांबविण्यात यावे.

जलसंपदा विभागात पाणी वितरणाच्या कामासाठी अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने सध्याच्या परिस्थितीत आऊट सोर्सिंग करुन हे काम करण्यात यावे.

सध्या मांजरा धरणात १२८.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातील कालव्यांच्या साठ्यावर ४९५० हेक्टर, जलाशयावर ३९०० हेक्टर, मांजरा नदीवरील आठ बंधाऱ्यांवर ३ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन करावयाचे आहे. तसेच पाणीपुरवठा आणि औद्योगिक वापरासाठी १४.५ दशलक्ष घनमीटर पाणी राखून ठेवण्यात आले आहे. निम्न तेरणा धरणामध्ये ६८.७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून यापैकी २ दशलक्ष घनमीटर पाणी बिगर सिंचनासाठी राखून ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.