धर्मगुरूंनी जनतेला खबरदारीचे महत्त्व पटवून द्यावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

May be an image of 2 people, people standing and people sitting
प्रशासनाला सहकार्य करण्याचे धर्मगुरूंचे आश्वासन
संसर्गापासून बचावासाठी मास्कचा वापर गरजेचा
जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठीनागरिकांचे सहकार्य आवश्यक

औरंगाबाद, दिनांक 16 : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना व्यापक प्रमाणात यशस्वी करत जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तरी सर्व धर्मगुरूंनी आपल्या स्तरावर नागरीकांना परिस्थितीचे गांभिर्य समजावून सांगत कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने विविध धर्मांच्या धर्मगुरूंसोबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सहायक पोलीस आयुक्त ए.डी.बनकर, उपायुक्त जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, धर्मगुरूंनी आपल्या माध्यमातून जनतेला मास्क वापर, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखणे या नियमांचे खबरदारीपूर्वक कटाक्षाने पालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करावे. कारण जनतेने नियमांचे योग्य प्रकारे पालन केले तरच आपण हा वाढता संसर्ग वेळेत रोखून सर्वांची सुरक्षितता जपू शकतो. तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरीकांनी गर्दी न करणे, मास्क वापर सातत्याने करणे यासह प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत धर्मगुरूंनी आपल्या स्तरावरून समजून सांगावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

तसेच वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी विभागीय आयुक्तांपासून पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि आपण स्वत: रस्त्यांवर, ग्रामीण भागात प्रत्यक्ष पाहणी करत आहोत. लोकांना विविध पद्धतीने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहोत. त्याला धर्मगुरूंनीही सहकार्य करत आपल्या स्तरावरून जनजागृती करून नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगण्याच्या कृतीची अंमलबजावणी करावी, असे श्री. चव्हाण म्हणाले.

तसेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जिल्ह्यातील संसर्गाबाबतची सविस्तर माहिती देऊन जिल्हाधिकारी यांनी लसीकरण मोहीमेबद्दलही यावेळी माहिती दिली. सध्या ज्येष्ठ नागरीक आणि 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्यांना लस देण्यात येत असून त्याबाबतही धर्मगुरूंनी जनतेमधील शंका दूर करत त्यांना लसीकरणाची सुरक्षीतता आणि फायदे समजावून सांगत लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

यावेळी पोलीस आयुक्त श्री. गुप्ता यांनी जनतेने स्वत:ला आणि आपल्या समाजाला कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क वापर, सॅनिटाझर, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे नियमित पालन करणे आता खूप गरजेचे बनले आहे. अन्यथा या वाढत्या संसर्गाने पून्हा एकदा सर्व जनजीवन ठप्प होण्याची वेळ ओढवू शकते, असे सांगून श्री. गुप्ता म्हणाले, वेळीच सर्वांनी खबरदारी घेऊन या संकटाचा एकत्रितपणे सामना केला पाहिजे. आपण गेल्या वर्षभरापासून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. मात्र गेल्या काही दिवसात ती पुन्हा बिघडत असून प्रत्येकाने त्याचे गांभिर्य लक्षात घेतले पाहिजे, असे सूचित करून श्री. गुप्ता यांनी तरूण वर्गाने रात्रीचे बाहेर पडणे, मोठ्या संख्येने एकत्र येणे, मास्क न वापरता गर्दी करणे यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. तरी गर्दी करणे टाळावे. विनामास्क बाहेर पडू नये. प्रत्येकाने आपली, आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेतली तर त्यातून समाजाचीही काळजी घेतल्या जाईल. लोकांचा रोजगार, व्यवसाय सुरू राहावे, अशी प्रशासनाची भूमिका असून आपण अंशत: लॉकडाऊनच्या माध्यमातून स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पण तरीही लोकांचे विनामास्क फिरण्याचे प्रमाण जोपर्यंत कमी होणार नाही, तोपर्यंत संसर्ग आटोक्यात येणार नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने  नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत धर्मगुरूंनी आपल्या स्तरावरून जनतेला मार्गदर्शन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी श्री. गुप्ता यांनी केले.

यावेळी उपस्थित सर्व धर्मगुरूंनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचे सांगून या आपत्तीत प्रशासन व सर्व यंत्रणा, पोलीस बांधव अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असल्याबाबत समाधान व्यक्त करून धर्मगुरूंनी आपल्या स्तरावरून नागरिकांना आवर्जून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच लसीकरणाच्या सुरक्षेबद्दल माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले.

अफझल शहा यांनी समाज माध्यमांवर कोरोना नसल्याबाबतचे अनेक चुकीचे व्हिडीओ प्रसारीत होत असतात. त्यावर प्रशासनाने प्रतिबंध आणावा, असे सूचित करून मशिदींमध्ये प्रार्थनेच्या वेळी समुदायांना कोविड नियमावलीचे पालन करण्यासाठी आवर्जून सांगण्यात येईल याबाबत आश्वासित केले. रशीद मामु यांनी स्थानिक पोलीस स्टेशन मधुनही अशा पद्धतीने स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन यंत्रणेच्या सहकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यास त्यास उत्तम प्रतिसाद मिळेल, असे सांगून ज्या ठिकाणी वेळेच्या निर्बंधानंतर लोक विनाकारण गर्दी करतात अशा ठिकाणी संबंधित पानटपरी, हॉटेल चालक किंवा गल्ली, मोहल्ल्यांमध्ये, ज्या घरांसमोर, चौकांमध्ये विनाकरण जमाव आढळुन येईल. तेथील लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यास लोक अधिक प्रमाणात नियमांचे पालन करतील असे सूचित केले. तसेच भदंत सुदत्त बोधी यांनी मोकळ्या मैदानांमध्ये रात्रीच्या वेळी क्रिकेट वा तत्सम खेळ खेळणारास प्रतिबंध करणे उचित ठरेल असे सांगितले. पार्श्वनाथ जैन मंदीरचे महाविर ठोले व एकनाथ मंदिरचे एस.के. शेलार यांच्यासह उपस्थितांनी मंदिरांमधुन मोठ्या प्रमाणात कोविड नियमावलीचे पालन करण्यात येत असून प्रशासनाच्या निर्देशानुसार विविध धार्मिक उत्सव, पुजाविधीचे कार्यक्रम स्थगीत करण्यात आले आहे. तसेच मंदीर, गुरूव्दारा, महानुभवाश्रम या ठिकाणी येणाऱ्या भावीकांकडून कोविड नियमावलीचे पालन करून घेण्यात येत असल्याचे सांगितले.

May be an image of 2 people and people sitting

बैठकीस जमाते-ए-इस्लामी हिंदचे वाजेद कादरी, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे हाफीज अजीम साबर, मुजीबउल्ला कासमी, सुन्नी जमातचे हाजी युनूस आदम अली, जागरण समितीचे मोहसीन अहेमद, ऑल इंडिया उलेमा बोर्डचे नायब अन्सारी, खादीमीन मासुमीन शिया पंथचे एजाज झैदी, आलम बरदार कमिटीचे माजी महापौर रशीद मामु मोहसीन अहेमद, एकबाल अन्सारी, खलील खान, हाफिज.अ.आजीम शाह, वाजेद कादरी, एजाज जैदी, समर जैदी यांच्यासह मुस्लीम समाजचे इतर मान्यवर त्याचसोबत धम्मदीप बुद्धविहाराचे भदंत सुदत्त बोधी, पार्श्वनाथ जैन मंदीरचे महाविर ठोले, महानुभव आश्रमाचे धर्मराज महानुभाव, संस्थान गणपती मंदीरचे प्रफुल मालाणी, एकनाथ मंदिरचे एस.के. शेलार, धावणी मोहल्ला येथील गुरूव्दाराचे खडकसिंगजी, उस्मानपुरा येथील गुरूव्दाराचे मनिंदर सिंगजी, रेणुका मंदिराचे पदाधिकारी यांच्यासह इतर धर्मगुरू व संबंधित उपस्थित होते.