राष्ट्रीय छात्र सेनेच्या उपक्रमास निधी कमी पडू दिला जाणार नाही – क्रीडामंत्री सुनील केदार

मुंबई, दि. 16 : राज्यातील राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सोई-सुविधांसह विविध उपक्रमास निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

मंत्रालयात राष्ट्रीय छात्र सेना यांच्या कार्यालयासह प्रलंबित विषयाबाबत आयोजित बैठकीत श्री.केदार बोलत होते. यावेळी एन सी.सी महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक वाय. पी. खांडुरे यांच्यासह राज्यातील सर्व एन.सी.सी.चे ग्रुप कमांडर उपस्थित होते.

राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps – NCC) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवाकार्यासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. बहुतेक सर्व शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश असल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि इमारतीसह विविध सुविधा देण्यासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, असे श्री.केदार यांनी सांगितले.

राज्यातील सर्व एन.सी.सी. ग्रुप कमांडर यांनी आपआपल्या विभागातील सादरीकरण केले. श्री.केदार यांनी सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगितले.