कोविड उपचारासाठी प्रशासकीय यंत्रणांना योग्य त्या खबरदारीचे निर्देश- पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड जिल्ह्यात आज 414 व्यक्ती कोरोना बाधित; एकाचा मृत्यू

नांदेड, दि. 15 :- मागील दोन आठवड्यापासून इतर महानगरासमवेत जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या काळजी करण्यासारखी आहे. हा प्रार्दुभाव अधिक वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणाना दक्षतेचे निर्देश दिले असून, जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजना संदर्भात शासन कमी पडणार नाही असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.

May be an image of 1 person, standing, sitting and indoor

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी , अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात यापुर्वी कोरोना उपचारासाठी प्रत्येक तालुकानिहाय जी यंत्रणा उभी केली होती त्यात आरोग्याच्यादृष्टिने अत्यावश्यक उपचाराच्या सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष चालणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून प्रशासकीय यंत्रणाना निर्देश दिले. जिल्ह्यातील विविध शासकीय शैक्षणिक संस्थाच्या इमारती कोविड सेंटरसाठी तयार ठेवण्याच्या दृष्टीने त्याची पाहणी करून तेथे सर्व प्रकारच्या प्राथमिक स्वरुपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात. आरोग्याबाबतच्या सोयी सुविधा सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणानी अधिक दक्ष असावे असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभाच्यावतीने सुक्ष्म नियोजन झाले आहे. कोरोना बधितांना ऑक्सीजन व औषधी कमी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जे कोरोना बाधित गृहविलगिकरणात आहेत त्यांनी बाहेर पडून इतरांच्या आरोग्याला बाधा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून काळजी घेण्यासाठी शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. ज्या परिसरात कोरोना बाधिताची संख्या अधिक प्रमाणात आढळून आली आहे. अशा परिसराचे सुक्ष्म नियोजन करुन तेथे आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बैठकीत ठेवण्यात आली.नागरिकांनी गर्दी टाळून, त्रिसुत्री कार्यक्रमाचा अवलंब करावा असेही, आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.

Similarities and differences – COVID-19 and influenza - PAHO/WHO | Pan  American Health Organization

जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

नांदेड दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 826 अहवालापैकी 414 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 238 तर अँटिजेन तपासणीद्वारे 176 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 27 हजार 371 एवढी झाली आहे. सोमवार 15 मार्च 2021 रोजी किनवट तालुक्यातील जुनातांडा येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 617 एवढी झाली आहे.

आजच्या 1 हजार 826 अहवालापैकी 1 हजार 320 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 27 हजार 371 एवढी झाली असून यातील 23 हजार 907 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 625 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 58 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 11, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 117, माहूर तालुक्यांतर्गत 10, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 13 असे एकूण 166 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 87.34 टक्के आहे.